दोन सिलेंडरच्या स्फोटाने आग लागून तीन भावंडाचे घर जळून खाक ; अंदाजे १० लाखांचे नुकसान कोसंबी खडसमारा येथील घटना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - २४/०५/२६ ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथे सकाळी ९-०० वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत निकुरे भावंडाचे तीन घरे जळून खाक झाली. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान होऊन तिन्ही भावाचा संसार उघड्यावर पडला.
आगीची माहिती मिळताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन जळालेल्या घरांची पाहणी केली आग लागलेल्या घरमालकांचे सांत्वन करून धीर दिला आणि लगेच संतोष यादव निकुरे, ऋषी यादव निकुरे आणि कार्तिक यादव निकुरे यांना लगेच स्वतःकडून आर्थिक मदत दिली.तीन भावंडांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
वाऱ्याचा वेग आणि घरात झालेल्या दोन गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे संपूर्ण गाव थोडक्यात वाचले, मात्र निकुरे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे.
पाहाता पाहाता आगीचे तांडव; १० लाखांची राखरांगोळी..!
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी निकुरे कुटुंबाच्या घरातून आगीच्या ज्वाला निघतांना दिसल्या.परिसरात मानवी वस्ती आणि शेतशिवारे असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. घटनेच्या वेळी निकुरे कुटुंबातील सर्व सदस्य सकाळीच शेतावर गेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मागील वर्षीच या तिन्ही भावंडांना 'पंतप्रधान आवास योजना' अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.
नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने हे तिन्ही कुटुंब तात्पुरते एकाच घरात राहत होते. या आगीत कुटुंबाचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून खालील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.
बांधकामाचे साहित्य १०० सिमेंट बॅग.
धान्य : १५० किलो तूर व लाखोरी डाळ, ५० किलो गहू, १ क्विंटल तांदूळ.
इलेक्ट्रॉनिक्स व रोकड: टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे, इलेक्ट्रिक साहित्य आणि ८० हजार रुपये रोख.
इतर: एक दुचाकी (टू-व्हीलर), सोने-चांदीचे दागिने आणि २ गॅस सिलिंडर.कॉम्रेड विनोद झोडगे पाटलांची धाव - घटनेची माहिती मिळताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी तात्काळ संवेदनशीलतेने पावले उचलली. त्यांनी ब्रह्मपुरीचे तहसीलदार मासाळ यांच्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाच्या (फायर ब्रिगेड) गाडीला पाचारण केले.
कॉ.झोडगे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून गावकरी व प्रशासनाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.हा निकुरे कुटुंबावर कोसळलेला फार मोठा आघात झाला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय मदत देण्यात यावी यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा.
या कठीण प्रसंगी गावकऱ्यांनी दाखवलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली. घटनास्थळी गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, ग्राम महसूल अधिकारी भूपेन गौरे, ग्रामसेवक भूमिका आखाडे, प्रशासक संगीता जंगठे
पोलीस पाटील लोमेश गेडाम, कुमदेव लेनगुरे, दिवाकर झाडे, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते लोमेश मेश्राम, योगाजी बोरकुटे सर, वनरक्षक बागडे, सचिन मलोडे यांच्यासह बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.सर्वस्व गमावलेल्या या गरीब कुटुंबाला आता सरकारकडून कधी आणि किती मदत मिळते मिळते याकडे निकुरे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

