सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या नवरगाव उपवनक्षेत्रातील सरांडी शेतशिवारालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला.
एस.के.24 तास
सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या नवरगाव उपवनक्षेत्रातील सरांडी शेतशिवारालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना आज मंगळवार (दि.२४ जून ) ला दुपारी उघडकीस आली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा पट्टेदार वाघ जिवंत अवस्थेतच जमिनीवर पडून होता.
त्यावेळी अनेक नागरिकांनी या वाघाला बघीतले दरम्यान काहींनी या वाघाचा व्हीडीओ काढला दरम्यान दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अनेक नागरिकांच्या समोरच या वाघाचा मृत्यू झाला.
नवरगांव उपवनक्षेत्रातील सरांडी गाव हा सिंदेवाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असून या गावालगत ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरात अनेक पट्टेदार वाघांचा वावर असतो. त्यातीलच जवळपास १६ वर्ष वयाचा पट्टेदार वाघाने उमानदी ओलांडून रत्नापूर बिटातील सरांडी जंगलात भटकंती करीत आला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात असून हा पट्टेदार वाघ सरांडी गावापासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर रोडच्या ३०० मिटर कडेला रामकृष्ण कावळे यांच्या शेतालगत असलेल्या कम्पार्टमेट ४५ / ६०९ ह्या जंगलात पुर्ण खंगलेल्या अवस्थेत जिवंत पडून होता. त्याला उठता न वृद्धपकाळाने त्याचा मृत्यु झाला असावा असा प्राथमीक अंदाज आहे.
मृत्यु कशाने झाला हे कळू शकले नाही : -
वनविभागाला सदर माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरीवार, क्षेत्रसहाय्यक एस बी उसेंडी, क्षेत्रसहाय्यक गडपायले, वनरक्षक चहांदे, पारेकर, सुरपाम, शहारे यांची टिम घटनास्थळावर दाखल झाली.मृतक वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. मृत्यु कशाने झाला हे कळू शकले नाही.
सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना होताच उपवनसंरक्षक राकेश सेपट यांनीही घटना स्थळाला भेट दिली. सदर घटनेचा पंचनामा करून वाघाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पि टी सी चंद्रपूरच्या सेंटरला पाठविणार असल्याची माहिती असून ह्या वाघाचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाला नंतरच कळणार आहे.