मुल तालुक्यातील राजोली येथे अवैध ऑनलाईन लॉटरी जुगारावर धाड 47 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील राजोली येथील मच्छी चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरी जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 47 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुल विभागात पेट्रोलिंग करत असताना राजोली गावातील मच्छी चौकात एका दुकानात अवैध ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली असता छापा टाकण्यात आला.
छाप्यात दुकानात दोन संगणकांवर GOLDEN FAST LOTTO नावाची ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याचे आढळले. संगणकाच्या स्क्रीनवर विविध आकडे दाखवून ठराविक रकमेवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले जात होते.तसेच दर 15 मिनिटांनी निकाल लागणारी दुसरी ऑनलाईन लॉटरीदेखील सुरू असल्याचे निदर्शनास आले.
दुकानात उपस्थित असलेला ज्ञानदिप विजय मसराम वय,28 वर्ष रा.डोंगरगाव ता.मुल याने आपण येथे नोकर असून सेंटर चा मालक मन्नु शिवा किसरवार वय,32 वर्ष रा.गुरुदेव चौक,सिंदेवाही असल्याचे सांगितले.कारवाई दरम्यान दोन संगणक मॉनिटर,दोन सीपीयू,की-बोर्ड, प्रिंटर, स्कॅनर,माऊस, अॅडॅप्टर, केबल्स, प्लास्टिक टेबल-खुर्च्या, लॉटरीचे बॅनर व चार्ट तसेच 1,730 रुपये रोख रक्कम असा एकूण 47 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध मुल पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 तसेच भारतीय न्याय संहिता,कलम 49 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सफौ धनराज करकाडे,पोअं सुमित बरडे, अजित शेंडे, मिलिंद टेकाम यांनी केले.

