आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील चौथीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. 📍आई - वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले आहेत.



आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील चौथीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या.


📍आई - वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले आहेत.


एस.के.24 तास


आरमोरी : गरिबीचे चटके आणि त्यातून वाट्याला आलेले एकाकीपण एका कोवळ्या जिवाच्या जीवावर उठल्याची हृदयद्रावक घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे घडली आहे.येथील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय संस्कार विनोद कन्नाके या बालकाने रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले आहेत. घरी कोणीही नसल्याने संस्कार एकटाच राहत होता. रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्याने टोकाचे पाऊल उचलले. शाळेतून घरी परतल्यानंतर अशा कोणत्या विवंचनेने त्याला ग्रासले होते की त्याला मृत्यू जवळ करावासा वाटला,याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.


एका शांत,निरागस बालकाचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला.या घटनेची माहिती कोजबीच्या पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी तातडीने आरमोरी पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.


संस्कारच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पालकांचे स्थलांतर, त्यातून येणारे एकटेपण किंवा शाळेतील एखादा प्रसंग त्याच्या नैराश्यास कारणीभूत ठरला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. गरिबीमुळे आई-वडिलांना दूर राहावे लागणे आणि मुलाने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणे,या वास्तववादी शोकांतिकेने परिसरात सुन्नता पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून वैद्यकीय अहवालानंतर या मृत्यूमागचे नेमके गूढ उकलण्याची शक्यता आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !