सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमना येथे साकारली रणगाड्याची प्रतिकृती.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे गाव जिल्हा आदर्श ग्राम असून येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. कळमना हे स्वच्छ, सुंदर, निर्मळ, पर्यावरण पूरक आणि मार्डन ग्राम म्हणून पंचक्रोशीत ओळखल्या जात असून येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई हे येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवित आहेत. आता यात आनखीन एका सुंदर आणि देशप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या उपक्रमाची भर पडलेली आहे.
ते म्हणजे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी आपल्या देशातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून अहोरात्र परिश्रम घेतले त्यामुळे भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण आणि प्रेरणा गावातील तरूण पिढी तसेच नागरिकांमध्ये कायम राहावी या हेतूने आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना येथे भारतीय सैन्य दलातील प्रमुख अस्त्र असलेल्या रणगाड्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात साकार सुध्दा केला आहे.
त्यांच्या या उपक्रमाने आपरेशन सिंदूर च्या वीर जवानांच्या शौर्याला एका वेगळ्या पद्धतीने कळमना येथे सलाम करण्यात आला असून देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दलचे हे प्रेम आणि या उपक्रमाबद्दल परिसरात नागरिक अत्यंत प्रभावित झालेले दिसून येत आहेत.
कळमना येथील रणगाड्याचे प्रतिक तयार करण्याकरीता येथील पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे, हनुमान मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर साळवे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल वाढई, सुरेश गौरकार, पांडुरंग क्षिरसागर, श्रीकांत कुकुडे, योगराज वांढरे, मदन वाढई, अमोल कावळे, अमोल निमकर, विठ्ठल विद्दे, संतोष बल्की, मारोती विद्दे, भुषण ताजने यासह स्थानिक गावकऱ्यांनी सहकार्य लाभले.
आपण स्वतः आणि कळमना गावातील अनेक नागरिक हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रभावित झालेले आहेत. राष्ट्रसंतांच्या साहित्यात प्रखर राष्ट्रप्रेम आणि ग्रामसेवा ते देशसेवेची पदोपदी शिकवण दिलेली आहे. यातूनच प्रभावी होऊन आपण गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच गावातील तरूण पिढी, नागरिकांना भारतीय सैन्याची राष्ट्रभक्ती, देशसेवेचे कठोर व्रत यांची प्रेरणा मिळत रहावी या उदात्त हेतूने गावात भारतीय सैन्यदलातील रणगाड्याचे प्रतिक तयार करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. - श्री.नंदकिशोर वाढई,आदर्श सरपंच, कळमना.