सावली तालुक्यातील कोंडेखल ग्रामपंचायत गैव्यवहारातील दोषींवर फौजदारी कारवाई करावी. - विजय कोरेवार माजी सभापती पंचायत समिती सावली
📍कारवाई न केल्यास पंचायत समितीत गावकऱ्यांना घेऊन आंदोलनाचा इशारा.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील कोंडेखल ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचे चौकशीत उघड झाल्याने त्यातील दोषी सरपंच व दोन्ही ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोंडेखल ग्रामपंचायतमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पंचायत समितीकडे केली होती. त्यानुषगाने विस्तार अधिकारी संजीव देवतळे यांनी चौकशी केली असता न केलेल्या कामाचा खर्च दाखवून निधीचा अपहार केल्याचे दिसून आल्याने सरपंच सरला कोटांगले व दोन्ही ग्रामसेवकांकडून समप्रमाणात रक्कम वसुल करणे.
विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी धीरधम्म रायपुरे व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आनंद देवगडे यांनी कसूर केल्याने त्यांचेवर जिल्हा परिषद कर्मचारी शिस्त व अपील १९६४ कलम ४ नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेला आहे.
मात्र ज्या पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ते पाहता फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. विद्यमान ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचा पूर्वीचा इतिहासही आर्थिक घोटाळ्याचा आहे.लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याने गावातील विकास कामांवर परिणाम झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारी २०२७ च्या परिपत्रकाप्रमाणे गटविकास अधिकारी यांना फौजदारी तक्रार करण्याचा अधिकार असल्याने येथील सरपंच सरला कोटांगले
तत्कालीन ग्रामसेवक आनंद देवगडे व विद्यमान ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे व कारवाई न केल्यास पंचायत समितीत गावकऱ्यांना घेऊन आंदोलनाचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

