कोरची तालुक्यात आठ वर्षांच्या निरागस अनाथ चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस.


कोरची तालुक्यात आठ वर्षांच्या निरागस अनाथ चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना  उघडकीस.


एस.के.24 तास 


कोरची : आठ वर्षांच्या निरागस अनाथ चिमुरडीवर तिच्याच नात्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. होळीच्या उत्सवात रंगांच्या नावाखाली माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार पाच दिवसांनंतर समोर आला असून,या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.पीडित मुलगी अनाथ असून तिचे मामा - मामी तिचा सांभाळ करत आहेत.


होळीच्या दिवशी गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना,आरोपीने या बालिकेला फूस लावून स्वतःच्या घरी नेले.रक्ताच्या नात्यात असलेल्या या 22 वर्षीय तरुणाने तिच्या असहायतेचा फायदा घेत पाशवी अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास " जिवंत सोडणार नाही " अशी धमकी देऊन त्याने चिमुकलीचे तोंड दाबले.


आरोपीच्या दहशतीमुळे ती चिमुरडी पाच दिवस गप्प होती.काही दिवसांनंतर तिला आंघोळ घालताना मामीला तिच्या शरीरावरील जखमा आणि पोटावर आलेली सूज दिसून आली. संशय आल्याने मामीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता,त्या चिमुरडीने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला.हे ऐकताच नातेवाईकांना धक्काच बसला.


घटनेची तक्रार मिळताच कोरची पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून,आरोपीवर पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनाथ मुलीवर झालेल्या या अन्यायामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून,या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !