४५ अंश तापमानात " विद्यार्थी शोध मोहिमेत " असलेल्या शिक्षकाचा मृत्यू ; शिक्षण क्षेत्रात शोककळा. 📍शिक्षकांवर वाढत चाललेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित.

४५ अंश तापमानात " विद्यार्थी शोध मोहिमेत " असलेल्या शिक्षकाचा मृत्यू ; शिक्षण क्षेत्रात शोककळा.


📍शिक्षकांवर वाढत चाललेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित.


एस.के.24 तास 


भद्रावती : राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थी शोध मोहिमेदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद हायस्कूल, माध्यमिक विभागातील शिक्षक राजू हिवंज यांचे रविवारी अकस्मात निधन झाले.

उष्माघात मृत्यूचे कारण असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली असून शिक्षकांवर वाढत चाललेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थी संख्या कायम राखण्यासाठी शिक्षकांना विविध भागांत जाऊन पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार राजू हिवंज हे गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हात ४५ अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी शोध मोहिमेत सक्रिय होते. याच काळात शिक्षकांवर जनगणना २०२६ संदर्भातील प्राथमिक जबाबदाऱ्यांचाही ताण वाढला आहे. येत्या १६ मे तारखेपासून अनेक शिक्षक घरगणना प्रक्रियेत सहभागी होणार असल्याने शालेय कामकाजासोबत बाह्य जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढले आहे.

काही दिवसांपूर्वी मोहिमेदरम्यान हिवंज यांना अस्वस्थ वाटू लागले होते.घरी परतल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दोन ते तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रविवारी त्यांचे निधन झाले.त्यांच्या मृत्यूमागे उष्माघाताची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




राजू हिवंज हे विद्यार्थीप्रिय, शांत स्वभावाचे आणि आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


या घटनेनंतर शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या भाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. भर उन्हात सुरू असलेल्या मोहिमा, जनगणना आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामकाजाच्या अटींबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !