नक्षलवादी " हिडमा " शी संबंधित ५४ गाणी तथा व्हिडिओ समाजमाध्यमावरून काढण्याची " यूट्यूब " ला सूचना.
📍नवीन उद्योगांना धमकावणाऱ्या,ब्लॅकमेलिंग त्रास देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार. - संदिप पाटील नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात येऊ घातलेल्या नवीन उद्योगांना धमकावणाऱ्या,ब्लॅकमेलिंग करणाऱ्या प्रसंगी त्रास देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार असल्याचा इशारा नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील यांनी दिला.
जहाल नक्षलवादी हिडमा याच्याशी संबंधित ५४ गाणी तथा व्हिडिओ समाजमाध्यमातून काढून टाकण्यासंदर्भात यू ट्यूब ला सूचना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जड वाहतुक हा सर्वाधिक चर्चेचा विषय असून अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष असल्याचे सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधतांना गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अति. पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लगतच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात असंख्य नविन उद्योग येणार आहेत.
मात्र मागील काही दिवसांपासून या उद्योगांना धमकावणे, ब्लॅकमेलिंग करणे प्रसंगी त्रास देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र भविष्यात हा प्रकार खपून घेतला जाणार नाही.अशा पध्दतीने त्रास देणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गपूर पोलीसांनी अशा सहा लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती अशीही माहिती दिली.
या जिल्ह्यात वाहतुकीचा सर्वात मोठा व गंभीर प्रश्न आहे. मात्र ही समस्येवर लवकरच तोडगा काढू असेही ते म्हणाले.दहा टक्के अपघात आणि मृत्यु कमी करण्याचे लक्ष्य असून आठ टक्के अपघाती मृत्यु कमी झाले असल्याची माहिती दिली. वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १०० होमगार्डची मागणी केली आहे. तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात टॅव्हल्स,ट्रक,दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहतात.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत यावरही उपाय योजना केली जााणार आहे. वाहनतळांसाठीही जागा शोध सुरू आहे. गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढविणे लक्ष आहे असेह ते म्हणाले. अंमलीपदार्थाची तस्करी या भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस अशा पध्दतीने तस्करी करणाऱ्या सर्वांवर लक्ष ठेवून आहे.
रामकृष्ण सुंचू याला अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग व त्रिची येथील डॉ.कृष्णा यांचा जामिन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पोलीसांचे पथक या दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत. दोन्ही डॉक्टर सध्या फरार आहेत.
हिडमा हा माओवादी संघटना सीपीआयचा केंद्रीय समितीचा सदस्य होता. या संघटनेवर २००९ पासून देशभरात बंदी आहे. त्यामुळेच हिडमा याच्या गितांवरही बंदी आहे. त्यामुळेच पोलीसांनी पुणे व एटापल्ली येथे हिडमाच्या गाण्यावर लग्नात नाचणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
एटापल्ली येथे पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहे. लोकांवर गुन्हे दाखल करण्यामागे या संघटनेवर बंदी आहे ही बाब निदर्शनास आणून देणे, लोकांमध्ये एक प्रकारे जागृती निर्माण करणे हा आहे. कुणावरही आकसापोटी कारवाई केलेली नाही. हिडमाचे गाणे किंवा इतरही मजकूर असलेले ५४ व्हीडीओ समाज माध्यमावरून, युटयूबवरून काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

