सावंगी मेघे विद्यापीठाच्या येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेच्या पोटात बाळ.
📍बाळाच्या पोटात परत बाळ ? दुर्मिळ घटना अवघड शस्त्रक्रिया.
एस.के.24 तास
वर्धा : विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी त्यास वाकुल्या दाखविणाऱ्या नैसर्गिक चमत्कार घडत असतातच. मग या घटना विज्ञानास आव्हान ठरतात. त्याचे कोडे सोडविण्यात मग वैज्ञानिक कसोटी लागते. यशही येते.
हा त्यातलाच दुर्मिळ प्रकार. वैद्यकीय विज्ञानने त्याची उकल केली. मेघे विद्यापीठाच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेने एका बाळास जन्म दिला.
मात्र या बालिकेच्या पोटात एक मोठा गोळा असल्याचे प्राथमिक तपासात डॉक्टरांच्या लक्षात आले.अद्यावत उपकरणातून तपासणी झाली. तेव्हा आणखी एक बाळ या नवजात शिशुच्या पोटात असल्याचे निदर्शनास आले. बालिकेचे वजन साडे चार किलो तर तिच्या पोटातील गोळा ५०० ग्रॅमचा.
वैद्यकीय इतिहासातील हा दुर्मिळ प्रकार आहे. त्याला ‘ फिट्स इन फीटू ‘ या पद्धतीच्या शस्त्रक्रियेतून दूर करावे लागते. फिट्स इन फीटू म्हणजे आईच्या गर्भात वाढणाऱ्या एका भ्रूणाच्या शरीरात दुसरा भ्रूण वाढणे. ही नैसर्गिकरित्या घडून येणारी दुर्मिळ वैद्यकीय घटना समजल्या जाते.
गर्भावस्थेतील काही विशिष्ट काळात जुळयांपैकी एक गर्भ विकसित नं होता तो दुसऱ्या गर्भात सामावतो. त्याच्याच शरीरात वाढू लागतो. बाळाच्या जन्मानंतर या स्थितीचे निदान होते. वेळीच लक्षात आल्यास शस्त्रक्रियेद्वारे त्या वाढलेल्या गोळ्याचे निर्मूलन केल्या जाते.
५०० ग्रॅम वजनाचा हा मांसळ गोळा दीड महिन्याच्या बालिकेच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरत होता. वैद्यकीय चमुने त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुख डॉ. आर.के.शिंदे यांच्या मार्गदर्शनात बाल शल्यचिकित्सक डॉ. थवेंद्र दिहारे यांनी डॉ. खुशबू वैद्य व आयुष गांधी यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया तडीस नेली.
त्यानंतर वाढलेल्या व काढून टाकण्यात आलेल्या गोळ्याची तपासणी झाली. तेव्हा या गोळ्याला केस, कानाचे अवशेष, बोटासारखे अवयव तसेच संबंधित शारीर भाग दिसून आल्याचे डॉ.शिंदे यांनी नमूद केले.
मग या दीड महिन्याच्या बालिकेस व्हेंटिलेटरवरून काढून सामान्य अवस्थेत ठेवण्यात आले.अत्यंत गुंतागुंतीच्या व नाजूक अवस्थेतील शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती लवकरच स्थिर झाली. तिला मातेद्वारे आहार पण सूरू करण्यात आला.
ही जोखमीची शस्त्रक्रिया अचूक निदान,डॉक्टरी कौशल्य,रुग्णालयातील सहकारी समन्वय व प्रगत वैद्यकीय सुविधा यामुळेच शक्य झाल्याचे डॉ.दिहारे म्हणतात.