संविधानाच्या यादीमध्ये समावेश असताना माना जमात बोगस कशी ? - प्रेमशाही मुंडा
एस.के.24 तास
चिमुर : जो प्रकृती पूजक आहे तो या देशाचा आदिवासी आहे. या आधारावर संविधानाने या देशातील आदिवासींना हक्क-अधिकार बहाल केले आहे. हे हक्क व अधिकार मिळवून स्वतःचा विकास करण्यासाठी सर्व आदिवासींनी भेदाभेद विसरून नवीन उलगुलान पुकारण्यासाठी एक व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे महासचिव प्रेमशाही मुंडा यांनी केले. तसेच संविधानातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ज्यांचा समावेश आहे ते सर्व आदिवासी आहेत. या यादीमध्ये माना जमातीचा समावेश असून ही आदिवासी जमात बोगस कशी ? असा सवाल न त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी मुग्दाई प्रेरणास्थळ, डोमा येथे प्रेरणादायी वीरांगणा मुग्दाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मुग्दाई जयंती व नागदिवाळी महोत्सवा दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार कृष्णाजी गजभे व कीर्तीकुमार भांगडिया,माजी, राज्यमंत्री रमेशकुमार गजबे,जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ सतीश वारजुरकर,सामाजिक कार्यकर्ते प्रा.भगवान नन्नावरे,बळीराम गरमडे,अरविंद सांदेकर,रामराव नन्नावरे, राहुल दडमल तसेच अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे मेघलाल मुंडा जी, बापी पंकज शिरका, विश्वनाथ वाकडे,अभय बूट कुवर,स.पोलीस निरीक्षक विनोद जांभळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आदिवासी समुदायासमोर बोलताना प्रेमशाही मुंडा यांनी विरांगणा मुग्दाईचा पराक्रम व आदिवासी धर्मकोडवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्व जनगणनेमध्ये आदिवासीसाठी विशिष्ट असा वेगळा धर्म कोड असायचा.परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात या कोडला जनगणनेतून वगळण्यात आले. आदिवासीच्या संविधानिक हक्कासाठी आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आदिवासी धर्म कोड मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समस्त आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन नवीन उलगुलान सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ.रमेशकुमार गजबे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रेमशाही मुंडा यांनी धर्म कोड बद्दल केलेल्या वक्तव्याचे भरपूर समर्थन केले.
प्रा.भगवान ननावरे यांनी मुग्दाई प्रेरणा स्थळाला सामूहिक वन हक्क कायद्याच्या माध्यमातून बंधनमुक्त करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुग्दाई प्रेरणास्थळाचा ब दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व व स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
आदिवासी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गुणवंत व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ समाजसेवकांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. सोबतच विरांगणा मुग्दाईच्या ठाण्यात पारंपारिक मुठपूजा, खणपूजा करण्यात आली. डायका वादन व गायन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंचच्या वतीने माना जमातीच्या पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर करण्यात आली. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष नन्नावरे यांनी केले.