पोषण आहारातून विषबाधा झाल्यास कारवाईचे स्वरूप निश्चित ; तपासणी वेळी पुरवठादाराचे गोदाम अस्वच्छ आढळल्यास पहिल्या वेळी 50 हजार रुपये,तर दुसऱ्या वेळी 1 लाख रुपये दंड केला जाणार.
📍विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.
एस.के.24 तास
पुणे : पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.पोषण आहारातून विषबाधा झाल्यास कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले.
तपासणी वेळी पुरवठादाराचे गोदाम अस्वच्छ आढळल्यास पहिल्या वेळी 50 हजार रुपये,तर दुसऱ्या वेळी 1 लाख रुपये दंड केला जाणार आहे.निकृष्ट धान्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रयोगशाळा अहवाल असल्यास पुरवठादारावर गुन्हा दाखल करून त्याची देयके न देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित,अंशतः अनुदानित शाळांतील वर्ग 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. त्यासाठी शाळांमध्ये तांदूळ, धान्य पुरवण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती निविदेद्वारे करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गट,महिला,स्वयंपाकी, मदतनीस यांच्यामार्फत अन्न शिजवून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते.या योजनेतील भोजनातून विषबाधेच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मानक कार्यपद्धती निश्चित करून परिपत्रक प्रसिद्ध केले.
अन्नातून विषबाधा होण्यामागे आहार तयार करताना पुरेशी काळजी न घेणे,निश्चित केलेल्या पाककृतीनुसार आहार तयार न करता वेगळ्या पद्धतीने करणे,आहार उघड्यावर शिजवणे,स्वयंपाकगृहात स्वच्छतेचा अभाव,निकृष्ट दर्जाचा आहार,मुदतबाह्य साहित्याचा वापर,स्वच्छ पाण्याची व्यवस्था नसणे, उष्णतेमुळे अन्न खराब होणे अशी विविध कारणे आहेत.
त्यामुळे विषबाधा होण्याच्या घटना टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक - शिक्षक, स्वयंपाकी- मदतनीस, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक,गोदाम अशा स्तरांसाठीच्या जबाबदाऱ्या निश्चित करून मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. विषबाधा सारखी घटना झाल्यानंतर आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या साहाय्याने करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती देण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने तांदूळ, धान्यादी माल चांगल्या दर्जाचा नसल्यास तो पुरवठादाराला बदलून देण्यास सांगणे,वापरण्याची मुदत पुढील एक वर्षाची असल्याची खात्री करणे, ओलावा - बाह्य घटकांपासून संरक्षणासाठी मालाची साठवणूक उंचावर करणे, पिण्याचे पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक राहील याची दक्षता घेणे,आहाराची नियमित तपासणी करणे, स्वयंपाकगृह परिसरात किडे, झुरळे, उंदीर,घुशी, साप, मांजर यांचा वावर असणार नाही, यासाठी उपाययोजना करणे, आहार शिजवणारे स्वयंपाकी, मदतनीस यांनी स्वतःची स्वच्छता राखणे, त्यांची दर सहा महिन्यांनी आरोग्यतपासणी करणे, जिल्हा पातळीवर दर महिन्याला धान्याचा नमुना तपासणे.
धान्य पुरवणाऱ्या पुरवठादाराच्या गोदामांची भारतीय अन्न महामंडळामार्फत वेळोवेळी तपासणी करून त्या गोदामातील तांदळाचे तीन नमुने संकलित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
वाटपापूर्वी अर्धा तास चव घेणे आवश्यक : -
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने वाटपापूर्वी अर्धा तास आहाराची चव शिक्षक, स्वयंपाकी,मदतनीस किंवा पालकांकडून तपासणे, त्या आहाराचा नमुना २४ तास हवाबंद डब्यात जतन करून ठेवणे,आहाराचा गंध,चव खराब असल्यास त्याचे वाटप न करणे, दर्जाबाबत विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास वितरण न करणे, विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यावर उलट्या,पोटदुखी किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.