सासऱ्याची संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जावई व मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात अडवून गळा आवळून केला खून ; दोन्ही आरोपी फरार
एस.के.24 तास
भंडारा : सासऱ्याची संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जावयाने आपल्या मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात अडवून गळा आवळून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोकणागड येथे उघडकीस आली.आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्याच्या पुलाखालील सिमेंटच्या पायलीत लपवून ठेवला होता.
या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी जावयासह त्याच्या मित्राविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत.
किशोर धर्मा कंगाले वय,६५ वर्ष रा.भंडारा असे मृतकाचे नाव असून अमित रमेश लांजेवार वय,३५ वर्ष रा.शिवाजी वॉर्ड, भंडारा असे आरोपी जावयाचे नाव आहे.किशोर कंगाले यांचा जावई अमित याच्या सोबत संपत्ती च्या कारणावरुन वाद सुरू होता.
आरोपी जावई व किशोर यांची मुलगी हे दोघेही त्यांच्या भंडारा येथील घरी राहण्यास आले होते.त्यामुळे जावयाच्या भितीपायी किशोर कंगाले हे आठ महिन्यापासून आपल्या कोकणागड येथील पुतण्याच्या घरी राहण्यास आले होते.९ जानेवारी रोजी किशोर कंगाले हे कोकणागडवरुन शिंगोरी येथे आपल्या शेतावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले असता जावई अमित व त्याच्या मित्राने त्यांना अडवून मारहाण केली.त्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह पुलाच्या खाली सिमेंटच्या पायलीमध्ये लपवून ठेवला.
इकडे,काका घरी परत न आल्याने किशोर यांचा पुतण्या मंगेश कंगाले यांनी कारधा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, ९ जानेवारी रोजीच अमित आपल्या मित्रासोबत आपल्याला मारहाण करीत असल्याची माहिती किशोर यांनी त्यांचा मित्र सुनील चौधरी यांना फोनवरुन दिली होती. परंतु, तेवढ्यात त्यांचा फोन कट झाला होता.
किशोर बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू केला असता त्यांची दुचाकी घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर रस्त्यावर दिसून आली. तसेच त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, शर्ट व बनियान रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात पडलेले दिसले. ११ जानेवारी रोजी किशोर यांचा मृतदेह कोकणागडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाच्या सिमेंटच्या पायली मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.
संपत्तीच्या वादातून किशोर यांचा जावई अमित लांजेवार याने आपल्या मित्राच्या मदतीने मारहाण करुन खून केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांविरोधात कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दोन्ही आरोपी फरार असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी करीत आहेत.