महापालिका निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला रात्रौ बंगाली कॅम्प मध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी ; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महापालिका निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला रात्री सुमारे ८.४० वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली कॅम्पमधील अपक्ष उमेदवार अजय सरकार याने भाजपच्या महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सरकार यांचे नाव होते.
स्थानिक पातळीवर त्यांचे नाव यादीतून वगळून आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकाला उमेदवारी दिली गेली.त्यानंतर सरकार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना उघड आवाहन दिले होते. या तक्रारीत राजकारण असल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला कार्यकर्ती ऑटोमध्ये बसलेली असताना अजय सरकार याने तिच्या साडीला व केसांना धरून जबरदस्तीने तिला ऑटोमधून बाहेर ओढले. यानंतर रस्त्यावरच तिच्यासोबत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महिला कार्यकर्ती जखमी झाली असून तिला तत्काळ शासकीय दवाखान्यातील आपत्कालीन (इमर्जन्सी) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बंगाली कॅम्प परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अजय सरकार यांच्या कथित गुंडगिरीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “ बंगाली कॅम्पची जनता अखेर किती दिवस ही दादागिरी सहन करणार ? ” असा सवाल उपस्थित केला जात आहे.संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच महिला कार्यकर्तीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून केली जात आहे.
हे संपूर्ण प्रकरण राजकीय असल्याची स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा आहे. अपक्ष उमेदवार सरकार यांनी निवडून आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरासमोर आंदोलन छेडणार असा इशारा काही दिवसापूर्वी माध्यमातून दिला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची उमेदवारी प्रथम सरकार यांनाच दिली होती.स्थानिक पातळीवर सरकार यांचे नाव कापून रॉबिन बिस्वास यांना उमेदवारी दिली गेली.

