खेडी - गोंडपिपरी राज्य महामार्गांवर भवराळा गावाजवळ 5 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : मुल तालुक्यातील खेडी - गोंडपिपरी प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 9 वर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवार दिनांक,15 जानेवारी 2026 गुरुवार रोजी सकाळी 8 :30 वाजता च्या सुमारास भवराळा गावाजवळ हृदयद्रावक घटना घडली. रस्ता ओलांडत असताना भरधाव पिकअप मॅटेडॉरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.
भवराळा गावातून जाणाऱ्या या राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला घरे व दुकाने आहेत. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुकानात जाण्यासाठी सोमेश्वर सरपाते यांची एकुलती एक मुलगी रुद्रप्रिया सोमेश्वर सरपाते वय,5 वर्ष ही रस्ता ओलांडत असताना गोंडपिपरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप क्रं.MH.34 BG 3743 या शेळ्या वाहतूक करणाऱ्या वाहनाने तिला जोरदार धडक दिली.अपघातात रुद्रप्रिया चा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त वाहन जुनासूर्ला येथील शंकर किसन शेंडे यांच्या मालकीचे असून ते वाहन चालक मुखरु ऋषी मेश्राम रा.पाथरी, हल्ली मुक्काम जुनासूर्ला चालवत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय राठोड यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.
रुद्रप्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आला. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने सरपाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनेनंतर संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले.संतप्त ग्रामस्थ व मृतक मुलीच्या आई-वडिलांनी काही काळ मृतदेह उचलू नये,अशी मागणी केली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.पुढील तपास मूल पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.

