देशातील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये आशिषची निवड झाल्याने गावाने काढली मिरवणूक.
★ आशिषच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकवटला.
एस.के.24 तास
वरोरा : वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील आशिष नन्नावरे या विद्यार्थ्यांची सामाजिक शिक्षणात देशातील नामांकित असलेल्या मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेमध्ये निवड झालेली आहे. तिथे तो डिझास्टर मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. कालच घोषित झालेल्या निकालामध्ये आशिषला प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहे. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 16 मे 2023 रोजी सायंकाळी त्याच्या गावातील लोकांनी चक्क ढोल ताश्याच्या गजरात त्याची मिरवणूक काढली आणि आशिषच्या आनंदात कुटुंबासोबतच शेकडो गावकरी सुद्धा सहभागी झाले. यावेळी संपूर्ण गावाच्या वतीने आशिषचा आणि आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
आशिषचे आई-वडील निर्मला व संतोष नन्नावरे शेती करतात. आशिषचे प्राथमिक शिक्षण गावीच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले असून 10 वी व 12 वी चे शिक्षण वरोरा येथे पूर्ण झाले. 10 व्या वर्गात नापास झालेल्या आशिषने पदवीचे शिक्षण सोशल वर्क या विषयात नागपूर येथे पूर्ण केले आणि स्वतःच करिअर घडवण्याचा एक वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर त्याने टीसमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. प्रवेश परीक्षा पास केल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. या परीक्षेची काठीण्य पातळी पार करून आशिषने स्वतःच्या मेहनतीने हे यश संपादन केलेले आहे. या विषयात देशभरातून फक्त 35 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
सत्कार समारंभाला उत्तर देताना आशिषने आपले मनोगत व्यक्त करून संपूर्ण गावकऱ्यांचे आभार मानले. आशिष शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्याला सामाजिक क्षेत्रामध्येच करिअर करायचे आहे आणि नामांकित शिक्षण संस्थांमध्ये वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी तो प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त करून दाखवला. स्वतःचे करिअर निवडण्याचा पारंपारिक मार्ग न शोधता एक वेगळा पर्याय निवडून त्यात त्याने यश संपादन केलेले आहे. त्यांने या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षकवृंद आणि मित्रपरिवाराला दिले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचे धीरज दारुंडे आणि बिंदू ताडे, हितेश नन्नावरे, वसंता झाडें, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष-आदित्य जिवतोडे , कार्याध्यक्ष निखिल राणे, साईनाथ केदार, सुशांत जीवतोडे, ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे आणि समस्त गावकरी उपस्थित होते.
" टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1936 मध्ये सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने करण्यात आली होती. नंतर 1944 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असे नामकरण करण्यात आले. स्थापनेपासूनच टिस ही उच्च शिक्षणातील उत्कृष्टची संस्था आहे. जी ज्ञानाचा उपयोग लोककेंद्रित व पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत विकास करण्यासाठी आणि न्याय्य समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करते. सर्वांसाठी सन्मान, समानता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांचे रक्षण करते. म्हणून आपल्या परिसरातील आशिषसारख्या अतिशय सामान्य आदिवासी शेतकरी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची टीससाठी निवड होणे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. आशिषचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पारंपारिक शिक्षणापलीकडचा विचार करून करियर घडवण्याच्या नवनवीन मार्ग आणि संधी शोधायला पाहिजे "- श्रीकांत एकुडे,अध्यक्ष ब्राईटएज फाऊंडेशन