दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित परतताना...
📍आलापल्ली - सिरोंचा महामार्गावरील दिना नदीच्या पुलावरून कार अनियंत्रित होऊन खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात चुलत सासऱ्यासह त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
आल्लापल्ली : दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून जड अंतःकरणाने परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली.आलापल्ली - सिरोंचा महामार्गावरील दिना नदीच्या पुलावरून कार अनियंत्रित होऊन खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात चुलत सासऱ्यासह त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या मृत्यूने आष्टी आणि बोरी परिसरावर शोककळा पसरली आहे.
यादव विठ्ठलराव कोलपाकवार वय,७३ रा.आष्टी ता.चामोर्शी आणि त्यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार वय,५५ वर्ष रा.बोरी ता.अहेरी) अशी मृतांची नावे आहेत.या अपघातात अभिजित कोलपाकवार, अर्चना कोलपाकवार आणि पद्मा कोलपाकवार हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आलापल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार वय,४९ हे 18 जानेवारीपासून बेपत्ता होते. १९ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह सिरोंचा मार्गावरील कालिमाता मंदिराजवळ आढळून आला होता.अज्ञात आरोपीने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते.या घटनेने आधीच परिसरात खळबळ उडालेली असताना, मंगळवारी त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक जमले होते. आष्टी येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक यादव कोलपाकवार हे आपल्या चुलत जावयाला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.सोबत त्यांचे चुलत बंधू व पोस्टमास्तर असलेले सुनील कोलपाकवार हे देखील होते.
अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपून सर्वजण कारने MH.33 V 8249 परतत असताना दुपारी 1:30.च्या सुमारास दिना नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने कार थेट खोल नदीपात्रात कोसळली. या पुलाशेजारी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असले तरी जुन्या पुलाची दुरवस्था आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा पूल " मृत्यूचा सापळा " ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व उपनिरीक्षक देवेंद्र पटले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

