भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला.तो गाजला आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेत निर्देश,पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण अनिवार्य.
एस.के.24 तास
वर्धा : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला. तो गाजला आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेत निर्देश दिलेत. कारण या कुत्र्यांचे चावे तापदायक ठरत होते.तसेच रस्त्यावरील विष्ठा पण हानिकारक. भारतातील ६ कोटी मोकाट कुत्री रोज सुमारे ३० हजार टन विष्ठा रस्त्यावर टाकतात,अशी आकडेवारी सादर झाली.
यामुळे माती, पाणी व हवा प्रदूषित होऊन अनेक रोगांचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. आता पाळीव प्राणी पण त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पुढे आले आहे.या पाळीव कुत्रा व मांजर यांची पण नोंद आवश्यक ठरली आहे. पाळीव कुत्रा, मांजरीचे लसीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशभरात मोकाट प्राण्यांच्या वाढत्या संख्येची दखल घेत तसेच मोकाट कुत्र्यांचे वाढते प्रमाण आणि होणारा इतर त्रास याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण तसेच नोंदणी याबाबत राज्यातील मुख्य सचिव यांना सूचना दिल्या आहेत.
या सूचनांचे पालन करून राज्यातील सर्व जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे.मोकाट कुत्र्यांना पकडणे व जन्मदर करणे तसेच अँटी रेबीज लसीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे.
जिल्हास्तरीय जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे .या समितीचे सदस्य सचिव उपायुक्त पशुसंवर्धन आहेत .उपायुक्तांच्या सूचनाप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद ,नगरपंचायत ,ग्रामपंचायत यांना सूचित करण्यात आले आहे.पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे.

