देवाडा खुर्द गावात पाण्याची भिषण टंचाई पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू ; ग्रामपंचायत पदाधिकारी चे दुर्लक्ष.
📍शेतातील खाजगी विहीर व आंबेतलावातील पाण्याचा होतो वापर 2 कि.मी.करावी लागते पायपिट.
राहुल सोमनकार : प्रतिनिधी एस.के.24 तास
पोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.गाववासीय गावापासून दूर दोन किमी अंतर असलेल्या आंबेतलावातून व काही शेतकऱ्यांच्या खाजगी विहिरीतून पाणी आणून पित आहेत.गावाला पाणी पुरवठा करणारी नळ योजना मागील एक महिन्यापासून बंद आहे.या गंभीर समस्येला ग्रामपंचायत प्रशासनाचे निष्क्रिय धोरण जबाबदार असल्याची नागरिकांची ओरड आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देवाडा खुर्द गावाजवळ अंधारी नदीचा प्रवाह असुन मार्च महिन्यातच अंधारी नदी पुर्णपणे कोरडी पडली आहे.येथून पुरविण्यात येणारी पाणी पुरवठा योजना सुद्धा बंद पडली आहे. ग्रामपंचायतचे निष्क्रिय धोरण व पाणी व्यवस्थापनाच्या नियोजनाचा अभाव यामुळेच मागील पंधरा दिवसापासून देवाडा खुर्द गावात नळाला पाणी नसल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.गावातील बहुतांश जलस्त्रोत आटलेला आहे.
पाणीपुरवठा योजना फक्त नावालाच आहे.या विभागाकडून नियोजनाचा अभाव असल्यानेच ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.एवढेच नव्हे तर दोन किमी अंतर असलेल्या आंबेतलावातून व खासगी मालकीच्या शेतातील विहीरीतील पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या आरो प्लॅन्टमध्येही पाण्यासाठी महिलांची झुंबड असते.
मात्र तोही स्त्रोत आटून राहिला आहे.त्यामुळे देवाडा खुर्द गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.प्रशासनानी देवाडा खुर्द गावातील पाण्याची भिषण समस्या तात्काळ दुर करावे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.