वैभव लहाने हे सैन्य दलात होते.जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असतांना त्यांना वीरमरण.
साश्रू नयनांनी शहीद जवानाला निरोप ; " वीर जवान अमर रहे ! च्या… सैन्य व पोलीस दलाकडून मानवंदना.
एस.के.24 तास
अकोला : देशसेवेत कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातील सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने शहीद झाले.त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले. " वीर जवान अमर रहे " च्या घोषणेत वीर जवानाला हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
अकोला जिल्ह्यातील वैभव लहाने हे सैन्यदलात होते. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असतांना त्यांना वीरमरण आले. ७ जानेवारी रोजी ते शहीद झाले. ‘१२ मराठा लाइट इन्फंट्री’ या युनिटमध्ये ते होते. देश सेवा देत असतांना त्यांना वीरगती प्राप्त झाली.
त्यांचे पार्थिव श्रीनगरवरून दिल्ली, पुढे विशेष विमानाने नागपूर व त्यानंतर मूळ गाव कपिलेश्वर (पो. वडद, ता. अकोला) येथे आणले. वीर जवानाचे पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीयांसह उपस्थित नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. प्रशासनाच्यावतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, ‘मराठा लाईट इन्फ्रंट्री’चे सीएचएम रामेश्वर पाटील, वैभव लहाने यांच्या कुटुंबीयांनी पुष्पचक्र अर्पण केले.
सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली. पोलीस विभागाच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी वीरजवान वैभव लहाने यांना निरोप दिला. जीवाची परवा न करता कर्तव्य बजावत असताना जवान वैभव लहाने यांना वीर गती प्राप्त झाली.
मूळ गावी सैनिकी सन्मानामध्ये अंत्यसंस्कार झाले. यावेळी आजी-माजी सैनिकांनी वीर शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली, असे देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनोहर चव्हाण यांनी सांगितले.अकोला जिल्हा वीर जवानांची भूमी म्हणून ओळखला जातो.
देश संरक्षणासाठी जिल्ह्यातील अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशासाठी कर्तव्य बजावत असतांना वीर जवानांनी दिलेले बलिदान कायम स्मरणात राहील,अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी मोठा जन समुदाय जमला होता.

