भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे शेतात झोपलेल्या वृद्धाची गळा चिरुन हत्या.
एस.के.24 तास
भामरागड : गावाबाहेरील शेतात खाटेवर झोपलेल्या वृद्धाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.१० जानेवारीच्या मध्यरात्री भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे ही घटना घडली.
पुसू नरंगो हबका वय,६६ वर्ष असे मृत वृद्धाचे नाव या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.पुसू हबका हे आपल्या पत्नीसह शनिवारी गावापासून काही अंतरावरील आपल्या शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेले होते.रात्री ते तेथेच झोपले.बाजूच्या खाटेवर त्यांची पत्नी झोपली होती.मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान पत्नीने आरडाओरड केला असता गावातील नागरिक धावून गेले.तक्रारीनंतर नेलगुंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हत्येचे नेमके कारण काय?, याविषयीचा तपास पोलिस करीत आहेत.शेतीच्या वादातून पुसू हबका यांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

