औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत ? सहपालक मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 📍खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी,असे निर्देश सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत.


औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत ? सहपालक मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश


📍खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी,असे निर्देश सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत.


एस.के.24 तास 


गडचिरोली : मागील वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाने गेल्या दहा वर्षांत खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून ११ मुद्यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले.


राज्यातील काही जिल्ह्यांत औषध खरेदीतील घोटाळे उजेडात आल्यानंतर गडचिरोलीतही सहपालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या औषधी भांडार कक्षाने राबवलेल्या खरेदी प्रक्रियेबाबत काही सामाजिक संघटनांचा आक्षेप होता. 


यासंदर्भात सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांच्याकडेही तक्रारी आल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश नागपूरचे उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना बुधवारी दिले. विशेष म्हणजे, दोन्ही औषध निर्माण अधिकारी मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. 


जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून महेश देशमुख यांची तत्काळ बदली करण्याचे निर्देश दिले होते.आरोग्य उपसंचालक डॉ.शंभरकर यांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई केली नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी अनेकदा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


" औषध खरेदीबाबत तक्रारी होत्या,त्यानुषंगाने चौकशीचे आदेश आरोग्य उपसंचालकांना दिले आहेत. औषध खरेदी प्रक्रियेतील अनियमितता कदापि खपवून घेतली जाणार नाही.- ॲड. आशीष जयस्वाल,सहपालकमंत्री


या मुद्यांवर होणार चौकशी : - 


1) दहा वर्षांत खरेदी केलेली औषधी व मिळालेला निधी.


2) जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा दरडोई औषध खर्च.


3) जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या औषधांच्या किमतीची तुलना, इतर जिल्ह्यांतील खरेदी करताना निश्चित झालेले दर.


4) ग्रामीण,उपजिल्हा रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रातील वार्षिक बाह्यरुग्ण संख्या (तुलनात्मक).


5) औषधींच्या साठवणुकीची व्यवस्था.


6) औषध खरेदी करताना जाहिरात कशी केली होती.


7) ई-औषध पोर्टलवर नोंदणी केलेली औषधे व प्रत्यक्ष खरेदी केलेली औषधे यांचा तुलनात्मक तक्ता.


8) ई-निविदा प्रक्रिया राबवताना वाजवी दरापेक्षा जास्त दराने खरेदी केली का दर अंतिम करताना इतर पुरवठादारांना विचारणा केली का.


9) तांत्रिक मंजुरी देताना इतर जिल्ह्यांच्यादरांशी तुलना केली होती का ?.


10) निविदा पात्र करण्यासाठी पूर्वी औषधी व साहित्य पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य केले होते का, अशी अट इतर जिल्ह्यात होती काय ?


11) निविदा प्रसिध्दी , कार्यारंभ आदेशाच्या तारखा तपासून अनियिमिततेबाबत खात्री करावी.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !