1 लाख रुपये ची लाच मागणी करणाऱ्या वनपाल महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जळगाव : लाकुड वाहतुकदाराकडून सुरुवातीला अडीच लाख रुपयांची व तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी वनपाल महिला, वन कर्मचारी आणि सॉ मिल मालक (खासगी इसम) अशा तिघांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीमती वैशाली गायकवाड (वनपाल), श्रीकृष्ण सॉ मिल चे मालक सुनिल धोबी (खासगी इसम ) आणी एक अनोळखी वन कर्मचारी अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावाने शेतातील निंबाची झाडे तोडली होती. तोडलेली झाडे तो मालेगाव येथे ट्रकने वाहून नेत होता. पारोळा परिसरातील एका फटाके कारखान्याजवळ वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड व दोघांनी तो ट्रक पकडला. पकडलेला ट्रक त्यांनी श्रीकृष्ण सॉ मिल येथे लावला. पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी तडजोडीअंती एक लाख रुपयांची मागणी तिघांनी केली.
तक्रारदारासह त्याच्या भावाने पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी वारंवार विनंती केली.ट्रक सोडवण्यासाठी तिघांनी तडजोडीअंती एक लाख रुपयांची मागणी तिघांनी रेटून नेली.लाचेच्या मागणीची रक्कम वैशाली गायकवाड व वनविभागाच्या कर्मचा-याने सुनिल धोबी यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. अखेर तक्रारदाराने जळगाव एसीबी विभागाकडे तक्रार केली. ती तक्रार तपासात निष्पन्न झाली.
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक राकेश दुसाने, बाळु मराठे तसेच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेकॉ विनोद चौधरी, चालक हे कॉ परशुराम जाधव, नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेकॉ नरेंद्र पाटील, पोना सुभाष पावरा आदींनी केली.


