अ-हेरनवरगांव हनुमान तलाव देवस्थान येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कीर्तन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०७/११/२५ तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे सालाबादाप्रमाणे हनुमान तलाव देवस्थान येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक काला तसेच स्नेहभोजन महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्तिक पोर्णिमा काल्या प्रसंगी बाळकृष्ण तलमले महाराज व संच नान्होरी यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यांच्या कीर्तनातील एकेक शब्दाचा भावार्थ श्रोत्यांना समाज जागृतीसाठी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रेरणादायी ठरेल असे उपस्थित गावकरी श्रोते मंडळी व महिला मंडळी यांनी आपापसात चर्चा करततांना बोलून दाखविले.
कीर्तनाच्या सरते शेवटी तलमले महाराज यांनी काला फोडण्यासाठी आरतीला सुरुवात केली असता कार्तिक काल्याची दहीहंडी अनिरुद्धजी उरकुडे यांनी रमेशजी करंडे, ऋषी कुमार ठेंगरे, रमेश ठेंगरे अध्यक्ष, होमराज राऊत तंटामुक्ती अध्यक्ष, अकुल राऊत पोलीस पाटील व इतर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत फोडली व काल्याच्या प्रसादाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना लाभला.
काला फुटल्यानंतर स्नेह भोजन महाप्रसादाचा कार्यक्रम अगदी शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. स्नेहभोजनाचा आस्वाद जवळपास अंदाजे तीन हजार नागरिकांनी घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाव देवस्थान समिती चे सर्व सभासद, गावातील उत्साही नवतरुण मुले,मुली ,बालगोपाल व नागरिकांनी स्वयंप्रेरणेने मोलाचे सहकार्य केले.

