30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिवस ग्रामजयंती विषेष. 📍राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आमचे दैवत कधी होणार ?

30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिवस ग्रामजयंती विषेष.


📍राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आमचे दैवत कधी होणार ?


एस.के.24 तास 


चिमुर : 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस, राष्ट्रसंतांच्या हयातीतच  भावीक भक्तांचा आग्रह, आम्हाला तुमचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करायचा आहे. राष्ट्रसंत खळखळून हसले. " अरे माझा जन्मदिवस करण्यापेक्षा ग्रामाचा जन्मदिवस साजरा करा. ग्रामसमृध्द करणे म्हणजेच ग्रामजयंती "

 


ज्या अठरापगड़ जातीच्या लोकांच जीवन समृद व्हाव म्हणून, राष्ट्रसंत स्वशरीराच्या आरोग्याची पर्वा न करता सातत्याने गावोगावी जाऊन लोकजागरण करायचे. त्यांच्या प्रबोधनात त्यांनी स्वतः  भोगलेल दारीद्र, अस्पृश्यतेचे चटके, अनेकदा घडलेली उपासमार यावर चिंतन असायच. अठरापगड जातीच्या नशीबीच हे भोग का येतात ?  या प्रश्नाच उत्तर राष्ट्रसंतानां सापडल.  अंधश्रध्दा, अंधरूढ्या, शिक्षणाचा अभाव, खोट्या व्रतांनाच दुःखमुक्तीचा मार्ग समजने.ह्या जन्मातले कष्ट मागच्या जन्माचे पाप समजत "ठेवीले अनंते तैेसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ " याचा खरा अर्थ समजून न घेता, प्रारब्धाला दोष देत जगणं.

 


राष्ट्रसंतांनी यावरचा उपाय आपल्या साहित्यातून मांडला. स्वर्गाची खरी कल्पना काय ? आपल खर स्वर्गसुख, आपल कुटुंब सुखाने नांदने हे होय. आपल गाव एक ग्रामकुटुंब या मैत्रीभावातून समृध्द होणे म्हणजेच राष्ट्रसमृध्द होणे. या खऱ्या मानवी मुल्याचा विचार दिला. राष्ट्रसंत फक्त प्रबोधन करीत बसले नाही तर भीवापूर जवळ आदर्श आमगाव,गुरूकुंज आश्रमाजवळ गुरूदेव नगराची निर्मीती हे आदर्श गाव निर्मानाचे मॉडेल होते.

 

आदिवासी मुलांसाठी  भारतातील गडचीरोली जवळ कमलापूर गावात पहीली निवासी आश्रमशाळा काढली. अनेक गावांमध्ये शाळा,रस्ते, नदीवरील बंधारे लोकसहभागातून, श्रमदातून उभे केले. हा राष्ट्रसंतांच्या कार्याचा वैचारीक वारसा शासनाचा एकही रूपया न घेता लोकसहभागातून कुठल्याही प्रसीध्दीच्या मागे न लागता गीताचार्य तुकारामदादांनी चालवला.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मादिवस ग्रामजयंती पर्वानिमीत्त अनेक गावांना मी भेटी दिल्या. तरी राष्ट्रसंतांच्या विचारातील खरे गाव दिसले नाही. ग्रामजयंती निमीत्त होणाऱ्या कार्यक्रमात, राजकीय कार्यक्रमासारखे समाज प्रबोधनापेक्षा हारतुरे घालण्यात वेळेचा अपव्यय करीत लोकांची गर्दी म्हणजे ग्रामजयंती महोत्सव, त्यासाठीचे प्रयत्न जाणवीले. काही गावात मात्र प्रबोधनातून राष्ट्रसंतांच्या विचारांना समजून घेत त्यांना जीवन जगण्याचा मार्ग बनवीत संस्कारी कुटुंब आनंदाने जगतांना दिसले.


ग्रामजयंती पर्वात 21एप्रिल ते 23 एप्रिल भंडारा -नवेगावबांध जवळ धाबेटेकडी - पवणी या लहानशा गावात तरूण डाॅ.राहुल ठवरे यांच्या पुढाकारांनी गावाचे भूषण असलेले प्रा.शाम ठवरे आदर्श शिक्षक आणि पत्रकारीतेतून वंचीत घटकांच्या न्यायासाठी झगडणारे त्यांच्या स्मृतिकार्याला उजाळा म्हणून मोफत आरोग्य तपासण्या, महाराष्ट्रभूषण सत्यपाल महाराजांच राष्ट्रीय प्रबोधन, आदिवासी प्रबोधन मेळावा, आदिवासी समुह नृत्यस्पर्धा यांच भव्य आयोजन केले होते. 


डाॅ. राहुल ठवरे सांगत होते, "अलीकडेच श्रीगुरूदेव अध्यात्म गुरूकुल गुरूकुंजातील रवीदादा मानव यांचा संपर्क मला ग्रामगीतेच्या विचारांची प्रेरणा देऊन गेला. '' 28 एप्रिल ला ग्रामजयंती निमीत्त भव्यपटांगणात सर्वधर्मीय सामुदायीक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर " क्रांतीनायक " महानाट्य सादर झाले. 


तीवसा जिल्हा अमरावती येथील हे भव्य आयोजन " राष्ट्रसंत युवक - युवती विचारमंच " यांनी केले होते. अमर वानखेडे त्यांनी जोडलेल्या युवकांचे ग्रामसमृध्दीसाठी प्रयत्न लाखमोलाचे आहे.  सामुदायीक प्रार्थनेतून सर्वधर्माचा समन्वय यातूनच मानवी मन जोडण्याच राष्ट्रसंतांच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो आहे.


राष्ट्रसंतांच्या जीवनातील अनेक प्रसंग ज्ञानेश्वर रक्षकांनी सांगीतले.  राष्ट्रसंत रुग्नशयेवर असतांनां 1967 मध्ये नागपूर शहरात हिंदु-मुस्लीम दंगल घडल्यामुळे ते किती अस्वस्थ झाले होते.त्यांच्या इच्छेतून घडलेली सर्वधर्मगुरूंची सभा बोलतांना त्रास होत असतांना, राष्ट्रसंतांनी केलेले मानवतेच्या शांतीच आव्हान. 


हे सार ऐकतांना उपस्थीताचे डोळे पाणावले. मोझरी गावातील मस्जीद बांधकामाला राष्ट्रसंतांनी दिलेली एक हजाराची देनगी. सर्वधर्माच्या प्रार्थना मानवकल्यानासाठीच. ह्या शब्दांनी वातावरण माणूसकीने भारावले. क्रांतीनायक महानाट्य राष्ट्रसंतांच्या क्रांतीकार्याचा ठसा युवामनावर उमटवून गेले.


29 एप्रीलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यावली या जन्मगावी  ग्रामजयंती सप्ताहात  सकाळच्या सामुदायीक ध्यानावर मला  माझ चिंतन मांडता आले. सामुदायीक ध्यानानंतर निघालेली ग्रामफेरी (रामधून) यावली गाव रांगोळ्यानीं सजले होते. त्याहीपेक्षा तरूण मित्रांनी शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञानाचा अविष्कार यावर प्रत्यक्ष तयार केलेले मॉडेल लोकांना प्रबोधन करीत होते. 


लहान मुलांच्या हातातील मोबाईल त्याचे दुषपरिणाम, मादक द्रव्य दारूच्या नशेत गाडी चालवीणे आयुष्याला कसे संपवते. आनंदी परिवार कसा उघड्यावर येतो. अशा जीवंत प्रसंगातून सहज प्रबोधन अनेक ग्रंथांच ज्ञान त्यातून मीळत होते.

पण याच रामधूनमध्ये "एक लोटा जल सब समस्या का हल " लहान लहान मुली दाखवत होत्या त्यातून काय समाज प्रबोधन ? गजानन महाराज आमच्या श्रध्देचे स्थान पण लहान लहान मुलांच्या हातात पेटती चीलम यातून बालममनावर आपण काय संस्कार करतो ? यावली हे गाव जन्मगाव म्हणून राष्ट्रसंतांच्या वीचारांचे प्रेरणास्थळ आहे.


अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत आजच्या सर्वच सामाजीक, राष्ट्रीय हेच नाही तर आंतरराष्ट्रीय निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय सांगीतले आहे. त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे. गाव चमत्काराच्या कथांनी समृध्द होत नाही. तरूण मनावर आपण सुसंस्कार करणे गरजेचे आहे. ग्रामगीतेवर आधारीत आजच्या सामाजीक आणि राजकीय प्रश्नाची उत्तरे यावर चिंतन दृष्यातून व्हायला हवे.  


गुरूकुंज आश्रम, यावली, वरखेड, गोंदोडा (चीमूर) येथील उत्सव मानवी जीवनाला दिशा देणारे असतात. येथील प्रयोग गावागावात घडतात याच भान आम्हा सर्व गुरूदेव सेवकांनी ठेवायला हवे. आमचे उत्सव परंपरावादी न होता परिवर्तनवादी असावेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात-

उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम ।

थोरांचे भाषण,भजन उत्तम । करावे तेथे ॥ २२ ॥ ग्रा.अ. २४

करिता संतांचा गुणगौरव । सांगू नये चमत्कारलाघव ।

पाडावा उत्तम वागणूकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥ ग्रा.अ. २४

पाहा गुरूदेव भक्तानों, गुरूदेव सेवकांनो, गुरूदेव प्रचारकांनो आम्ही कुठे चुकत आहोत याच चिंतन करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आमचे दैवत केव्हा ठरेल ?


ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक - अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा मो.नं.9823966282

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !