वाहनाने कळपातील २० मेंढ्या चिरडल्या, २५ गंभीर जखमी ; मेंढापाळाचा मुलगा याच्या डाव्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने तोही किरकोळ जखमी.
एस.के.24 तास
अकोला : अकोट अंजनगाव महामार्गावर मेंढराच्या कळपात अज्ञात वाहन घुसल्याने सुमारे 20 मेंढ्या ठार झाल्या. तर 25 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरूवारी (दि.९) रात्री एकच्या सुमारास घडली.
प्राप्त माहिती नुसार, अकोट ते अंजनगाव महामार्गावर जनुना येथील बन्सी मदने यांच्या मालकीच्या मेंढ्याचा कळप चारा शोधण्यासाठी आकोट कडे जात होता. रुईखेड फाटा नजीक अज्ञात वाहनाने मेंढरांना धडक दिल्यानंतर घाबरलेल्या चालकाने त्याच दिशेने वाहन मेंढराच्या कळपात पलटवून चक्क मेंढारांच्या अंगावरून पुन्हा अंजनगावाच्या दिशेने नेले.
या घटनेत चाकाखाली अनेक मेंढर चिरडले गेले. मृत मेंढारांच्या पोटातून लहान लहान पिल्ले असलेले गर्भ बाहेर पडलेली दिसत होती. अपघाताच्या वेळी मागे असणारा मेंढापाळाचा मुलगा संदीप मदने याच्या डाव्या पायावरून त्या गाडीचे चाक गेल्याने तोही किरकोळ जखमी झाला.
अकोट ग्रामीण पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी यांनी जागेवरच मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. जखमी मेंढरांवर उपचार केले. तलाठी यांनी देखील पंचनामा करून वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविला असून यात मेंढपाळाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मांगणी करण्यात आली आहे.