धान भरडाई घोटाळा प्रकरण ; आरमोरी 1 तर देसाईगंज मध्ये 3 गिरणी मालकांवर गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
वडसा : धान खरेदीतील चार कोटींचा कथित घोटाळा त्यानंतर धान बोनस वाटपातील अनियमिततेचेे प्रकरण ताजे असताना आता लाखो रुपयांचा धान भरडाई गैरव्यवहार उजेडात आला आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई करुन पाठराखण केलेल्या चार गिरणीमालकांवर फौजदारी कारवाईचे आदेश शासनाने दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर २४ तासांत चार गिरणीमालकांवर फौजदारी कारवाई झाली. त्यामुळे भरडाईच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात पाठवून सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना जबर हादरा बसला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरी येथील जनता राईस मिलला २०२१-२२ मध्ये ९ हजार ३१६ क्विंटल धान भरडाईसाठी दिले होते. त्यापासून त्यांनी ६ हजार २४३ क्विंटल तांदूळ तयार करून शासनाला पुरवला. त्यापैकी एका लॉटमधील ४०५ क्विंटल धानापासून २७० क्विंटल तांदूळ तयार केला. मात्र, प्रत्यक्षात शासकीय गोदामात काळ्या बाजारातील निकृष्ट दर्जाचा तांदूळ (बीआरएल) पुरवठा केला.
यातून ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली, असा ठपका ठेऊन गिरणीमालक हैदर पंजवानी यांच्याविरुद्ध २ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. ३ मे रोजी देसाईगंजातील अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. त्यांच्यावरही ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांच्या धानाचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे.
केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत तांदूळ निकृष्ट आढळला. त्यानंतर तपासणी केली असता ४०५ क्विंटल धानापासून तयार करुन गोदामात पाठविलेला २७० क्विंटल तांदूळ खाण्यास अयोग्य असल्याचे समोर आले.तिसऱ्या प्रकरणात सोनल पोहा उद्योग मिल, देसाईगंजच्या मालक माया प्रभाकर डांगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. राईस मिल बंद असताना , विद्युत जोडणी नसताना धान भरडाई केल्याचे दाखवून काळ्या बाजारातील तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका ठेवला आहे.
एकूण १ लाख ८२ हजार ७४३ रुपयांच्या फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे. चौथ्या प्रकरणात शारदा स्टिम प्रोडक्ट, कुरूड या संस्थेचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. १५ एप्रिल २०१९ रोजी यशवंत नाकतोडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली.यात शारदा स्टिम प्रोडक्ट ही गिरणी बंद आढळली,तरीही ३ हजार ७५१ क्विंटल धान भरडाई केल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. यातून अंदाजे ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे.
जिल्हा पुरवठा विभागातील तहसीलदार तथा खरेदी अधिकारी मनोज डहारे यांच्या फिर्यादीवरुन चारही गुन्हे नोंद झाले. बीएनएसच्या (भारतीय न्याय संहिता) काळ्या बाजारास प्रतिबंध व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अधिनियम १९८० कलम ३, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम १०, भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२० नुसार चारही गुन्हे नोंदविण्यात आले.
२४ तासांत धान भरडाई घोटाळ्याचे चार स्वतंत्र गुन्हे नोंद झाले. आरमोरीत एक तर देसाईगंजातील तीन गिरणीमालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
कोठे किती घोटाळा ?
📍जनता राईस मिल, आरमोरी ७ लाख ८५ हजार ७०० रुपये.
📍अजय राईस मिल, देसाईगंज ७ लाख ८५ हजार ७०० रुपये.
📍सोनल पोहा उद्योग मिल, देसाईगंज १ लाख ८२ हजार ७३४ रुपये.
📍शारदा स्टिम प्रोडक्ट, कुरूड ता. देसाईगंज ७० लाख रुपये.