चामोर्शी तालुक्यातील मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या.
एस.के.24 तास
चामोर्शी : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना 5 मे रोजी दुपारी 3:00.वा.च्या सुमारास घडली. मंगलदास आत्राम वय,40 वर्ष रा.मुधोली रिठ ता. चामोर्शी असे त्या सरपंचाचे नाव आहे.
मृतक मंगलदास हे सकाळच्या सुमारास घराबाहेर पडले.मुधोली चक क्र.2 मधील एका शेतकऱ्याच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.याची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आष्टी पोलिस देखील तातडीने पोहोचले.पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कुटुंबाचा आधार गेला : -
मंगलदास हे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व परिचित होते.आपल्या कार्यकाळात त्यांनी गावात बरीच विकासकामे केली. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.घरात ते एकटे कमावते होते.त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.