अड्याळ टेकडीचे " भूवैकुंठ " निर्माण करणारे निष्ठावान कुठे हरपले ?
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : गुरूदेवाच्या लेकरांनो, गीताचार्य तुकारामदादांच्या निर्मीत श्रीगुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर भूवैकुंठ निर्माण करण्यासाठी घाम गाळणाऱ्या सच्या सेवकांनो, तुमच्या श्रमातून दगड-धोंड्यांना आकार देत भूवैकुंठ साकारले. तुकारामदादांच्या सहवासातील उपदेशाने अनेकांची घरे भवैकुंठ झाली. दादांना दिलेला संकल्प आजही नियमीत पाळणारे, कपड्यातून साधेभोळे दिसणारे , पण जीवन ग्रामगीतेच्या विचाराने जगणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार जयगुरू !
अनेकांच्या श्रमाने अड्याळ टेकडी फुलली, अनेकांचे जीवन या टेकडीच्या कार्याच्या उभारणीत समर्पन झालेत. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ म्हणणाऱ्यांची झेप विदर्भापलीकडे पोहचली नाही. पण तुकाराम दादा सातत्याने आंध्र, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश दौरा करायचे. त्यातून गुजराथचे रतनलालजी, चव्हाणदादा समर्पण भावाने अड्याळ टेकडीवर राहले.
रतनलालजीचे निर्वाण इच्छेप्रमाणे अड्याळ टेकडीला झाले. चव्हाण दादांची प्रकृती अतीखालावली कुणाला त्रास होऊ नये म्हणून मुलाकडे गुजराथला गेले तेथे त्यांनी अंतीम श्वास घेतला. जानकुबाई यांचे टेकडीच्या नवनिर्मीतील योगदान फारच मोठ लोकांना दंतकथाचे वाटेल. त्यांच्या तोंडूनच त्या कथा ऐकतांना अंगावर काटा उभा राहायचा. पण त्यांनी त्यातून जीवनाचा आनंद शोधला. टेकडीवर अन्नधान्य नव्हत.
तुकारामदादांनी सांगाव जानकुबाईन ऐकावे, चींचेचा पाला तोडून त्याच उकडलेल पाणी पिऊन, बेलाचे पाने खाऊन, तरोट्याची भाजी खाऊन जीवन जगणारी या हाडामासाच्या माणसांनी भूवैकुंठ उभे केले आहे. भाजीपाले गुरूजीसारखी घरकुटुंब गुरूदेवाच्या कार्यासाठी त्यागलेली माणंस, हा मानवी ठेवा तुकाराम दादांनी जोडला. त्यातून दादांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या विचारांची चळवळ गावा, गावात पोहचवून सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने जगने शिकवले.
श्रमदान-संकल्प-विश्वास त्यातून श्रीगुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ, गुरूकुंजातील श्रीगुरूदेव अध्यात्म गुरूकुल, पंढरपुरचे ग्रामगीता दर्शन मंदिर लोकांचा विश्वास संपादन करून बीना पावतीने धन गोळा करून उभारले, चोख हिशोब ठेवत. मात्र शासनाचा एक रूपया न घेता. कोणी नावाची पाटी लावा अस म्हटल नाही.
असा विश्वास संपादन करणारा कोणी तरी दाखवा गुरूदेव सेवा मंडळात, आंध्रचा एक राजकीय मंत्री जनसमुदायात बसतांना, सर्वसामान्य भावीकांमध्ये वावरतांना आम्ही पाहला. विदर्भातले अनेक राजकीय पुढारी बीना निमंत्रनाने अड्याळ टेकडीवरील कार्यक्रमात लोकसमुहात बसून दादांचे अनमोल शब्द ऐकायचे.
रतनालालजी, चव्हाणदादा, भाजीपाले गुरूजी सारखी अड्याळ टेकडीवरील निष्ठावान माणसे कुठे हरवली? आज तर कोर्टकचेऱ्या करण्यातच ग्रामगीतेचा विचार शोधणारी माणस सर्वदूर दिसतात. हयातभर दादांचा द्वेष करणारी आता सत्तेचा माज चढलेली माणस, ज्यांनी श्रमाचा आणि धनाचा कुठलाच थेंब दादांच्या कार्यात न दिलेली माणस, दादांच्या कार्यावर हक्क सांगून अश्रू गाळतात. कोर्टकचेऱ्यात गुरूदेव सेवकांच्या कष्टाच्या पैशाची उधळण करतात. या विकृतींना रोखण्याची क्षमता गुरूदेवांच्या लेकरात नाही का ?
अड्याळ टेकडीवरील वार्षीक महोत्सवाच्या दिवशी गटबाजीच राजकारण, पोलीसांचा हस्तक्षेपात कार्यक्रम बंद पडतात. ह्याचसाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळाची चळवळ आहे का ?
डोके फोडाफोडी करा हाच उपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुकाराम दादांनी आपल्या कार्यातून मांडला का ? ह्या सर्व विकृत डोक्यांवर वचक कोण ठेवणार ? दादांच्या शब्दावर ग्रामगीतेच्या विचारासाठी लढणारे बहादुर शिपायी संपलेत का ? कोण करणार चिंतन ? पण दादा आता तुमचच स्मरण होत आहे.
दादा चोरटीचे गाव गणराज्य हक्काच आंदोलन आठवले !
गीताचार्य दादा आपण या भूवैंकुठाची धुरा हजारो गुरूदेव सेवकांच्या हाती सोपवून गेले. आम्ही चर्चेत म्हणायचो, " दादा संस्था रजीस्टर करा. " तत्कालीन मंत्री आर.आर. पाटील, अन्ना हजारे, दुर्गादासजी रक्षक याच विषयावर तुमच्याशी बोललेत. तुम्हाला लाखो रूपये शासकीय फंड तसेच मोठे उद्योगपती फंड देतील असे सांगीतले.
पण संस्था रजीस्टर न करता लोकांच्या कष्टातून, श्रमदानातून, धनातून निस्वार्थ श्रीगुरूदेव चळवळ जनमनात रूजावी ही तुमची धडपड.आपण नेहमी सांगायचे, 'अरे रजीस्टर संस्थेतील सत्तेचे झगडे.खोटे व्यवहार यातूनच चळवळ कोर्टकचेऱ्यात अडकते.
पण लोकसहभागातून चळवळीची शक्ती वाढवत लोककल्यान घडू शकते.' दादा तुमचा आत्मविश्वासाला अध्यात्माच अधिष्ठान होत. पण नैतिकता ढासळलेल्या सत्तेच्या लालची लोकांनी साम-दाम-दंड-भेद वापरत आपण निर्माण केलेल्या अध्यात्माच्या केंद्राना कोर्टकचेऱ्यात नासवले. दादा तुमचा द्वेष करणारे आज तुमचे वारसदार म्हणून मीरवीत आहे. अड्याळटेकडीचा सातबारा अखिल भारतीय झाला.
२१ एप्रिल २०२५ ला हजारो गुरूदेव सेवकांचा शांती मोर्चा ब्रम्हपुरीच्या तहसीलीवर धडकला. शासकीय यंत्रणा हादरली. चोरटी, लाखापूर, लोणारा गावातील गाव गणराज्यासाठीचा लढा आठवला. तुम्ही पेटवलेली अन्याया विरुद्धची धग आजही कायम आहे. अड्याळ टेकडीच सार्वभौम भूवैकुंठ वाचविण्यासाठी ती अंगार कधीही पेटू शकते. कारण ही फाटक्या कपड्यातील माणस सामुदायीक प्रार्थनेतील शब्द जगतात.
" हो चिढ झुठे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करन को दास की, पर्वा नहीं हो जान की ॥ " पण अदृश्य राजकीय शक्तीने अड्याळ टेकडीवर आपल्या सर्वांचे श्रध्दास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस (ग्रामजयंती) ३० एप्रील ऐवजी २१ एप्रिलला घेऊन श्रध्देचे प्रदर्शन केले. शांती मोर्चातील मोजके गुरूदेव सैनीक दादा तुमच्या समाधीच्या पायऱ्यांवर ठान मांडून बसली. कारण चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.अशोक ऊईके येणार होते.
त्यांच्या गाड्यांच्या ताफा आला गुरूदेव सैनिकांनी ताफा अडवला. कारच्या सनरूफ दरवाजातून चिमूरचे आमदार अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्य बंटी भागडीया बोलायला उठले. पण गर्दी पालकमंत्र्याशी बोलायला उत्सुक होती.डाॅ.अशोक ऊईके यांना लोकभावना कळल्या. त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.त्यात किती तथ्य आहे. हे दादा काळच सांगेल.
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक - अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा मो.नं.9823966282