कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा केली,पण शासनाने अजूनही थकीत प्रोत्साहन भत्ता दिला नाही.
📍आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप उसळला.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तथा सर्व तालुक्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या मनात तीव्र असंतोष उसळला आहे.कोविड - 19 च्या काळात शासनाच्या आदेशानुसार अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करूनही शासनाने जाहीर केलेला दरमहा रु.1000 /- चा प्रोत्साहन भत्ता आज 3 वर्षांहून अधिक काळ लांबणीवर टाकला आहे.मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 या 31 महिन्यांचा भत्ता अद्यापही अनेकांना मिळालेला नाही. त्यामुळे नाराजीचे वातावरण तापले आहे.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेली सेवा पण शासनाला जाणीव नाही.कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेव्हा संपूर्ण देश थरथरत होता,लोक घराबाहेरही पडत नव्हते, तेव्हा ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा संपूर्ण भार या महिला कर्मचाऱ्यांवर होता.
घराघरात जाऊन सर्वेक्षण केले,ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांची माहिती गोळा केली,गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली,कोविड चाचण्या, लसीकरण मोहिमा यात प्रत्यक्ष सहभाग घेतला,गावोगावी जनजागृती केली,क्वारंटाईनची व्यवस्था,स्थलांतरितांची तपासणी अशा कठीण कामात स्वतःला झोकून दिले.
या सर्व कामांदरम्यान अनेक आशा कार्यकर्त्या स्वतः संक्रमित झाल्या, त्यांच्या कुटुंबीयांनीही यात त्रास सहन केला. तरीही कोणतीही तक्रार न करता, कोणतीही भीड न बाळगता त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.आज त्या महिलांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी आंदोलने करावी लागतात,ही बाब मानवतेलाच लज्जास्पद आहे

