नवेगाव येथील तलावाची पाळ फुटून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या धान पिकांची बऱ्यापैकी नुकसान होत आहे.पूर सदृश्य स्थिती जिकडे तिकडे पाहावयास मिळत आहे.नदी,नाले दुतर्फा भरून वाहत आहेत.
अशातच दि.२८ जुलै रोजी सकाळी सुमारे ६-०० वा.नवेगाव येथील मोठ्या तलावाच्या मध्यभागी पाळीला मोठे खिंडार पडून पाळ फुटून तलावाचे संपूर्ण पाणी वाहून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचीअतोनात हानी झालेली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे आणि भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुणजी शेडे ताबडतोब सकाळी ८-०० वा घटनास्थळी पोहोचले.
यावेळी भीमराव माहुरे,आनंदराव राऊत व इतर शेतकऱ्यांनी आपली व्यथा सौ.वंदनाताई शेंडे आणि प्राचार्य अरुणजी शेंडे यांना सांगितली .वंदनाताईंनी या घटनेची माहिती सिंचन विभागाचे जे.ई. राऊत यांना सांगून बोलावून घेतले. तलावाची फुटलेली पाळ लवकरात लवकर भरून काढावी.अशा सूचना दिल्या.जे.ई.राऊत यांनी हे कार्य अवघ्या काही दिवसात पुर्ण केले जाईल असे सांगितले.
नंतर भ्रमणध्वनी द्वारे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांना या घटनेची माहिती दिली.आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रशासकीय यंत्रणेस कामाला लावावे,अशी मागणी केली.सौ वंदनाताई शेंडे आणि प्राचार्य अरुणजी शेंडे यांच्या कार्यतत्परतेचे नवेगाव गावात आणि परिसरात कौतुक केले जात आहे.