मुरसा गावात पारंपरिक पद्धतीने आझाद युवा गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न.
एस.के.24 तास
भद्रावती : आझाद युवा गणेश मंडळ मुरसा या मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, गेली सलग चार वर्षे हे मंडळ गणेशोत्सवाचे आयोजन करत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उत्सव रंगतदार झाला.
या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माईंड गेम, पोटॅटो रेस, रांगोळी स्पर्धा यांसारख्या अनेक मनोरंजक स्पर्धांमुळे वातावरणात उत्साहाचे रंग भरले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.
गणेशोत्सवात केवळ मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचे जतन करण्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले. पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळाच्या गजरात काढण्यात आलेली भव्य रॅली मध्ये गावकऱ्यांना संदेश देणारे देखावे आणि लहान मुलांची वेशभूषा ही आकर्षणाचे केंद्र ठरली.शेवटी, सर्व नागरिकांच्या उपस्थितीत बाप्पांना मनापासून निरोप देत आझाद युवा गणेश मंडळाने गणेशोत्सवाचा समारोप उत्साहात केला.