कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळील जंगल परिसरात चारित्र्यावर संशय पत्नीचा गळा दाबून खून.
एस.के.24 तास
कोरची : कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळील जंगल परिसरात पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत सतत पत्नीशी वाद घालणाऱ्या पतीने अखेर वैवाहिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम वय,34 वर्ष आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम वय,36 वर्ष रा.सोनपूर असे आहे.या दाम्पत्याच्या लग्नाला सुमारे 10 वर्षे झाली असून त्यांना 2 लहान मुले आहेत.त्यांना दोन मुल आहेत.वय 9 व 5 वर्षाचा असून आई च्या मृत्यू नंतर त्यांच्यावर संकट कोसळले आहे.
पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडखोर असून पत्नीच्या चारित्र्यावर तो वारंवार संशय घेत असे.यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत. 31 ऑगस्ट रोजी दाम्पत्यात मोठा वाद झाला.1 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम पत्नीला माहेरी सोडण्यासाठी पायी नेण्यास सुरुवात केली.सोनपूर -गोडगुल दरम्यानच्या कामेली जंगल परिसरात जात असताना पुन्हा वाद उफाळला.संतापाच्या भरात पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडले.तिच्या छातीवर बसून गळा दाबून तिचा खून केला.
पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी गावात परतला.यावेळी त्याने दारूच्या नशेत गावकऱ्यांसमोरच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मृतकाची आई चमरीबाई बोगा रा.चौकी,जि.मानपूर - मोहला, छत्तीसगड यांना 3 सप्टेंबर रोजी मिळाली.त्यांनी तात्काळ कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस सोनपूर येथील शेतातून अटक केली.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. 2017साली कोटगुल को - ऑपरेटिव्ह बँकेच्या चोरी प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे त्याच्या आक्रमक प्रवृत्तीबद्दल ग्रामस्थांना पूर्वीपासूनच शंका होती. सध्या या प्रकरणाचा तपास कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलीस ठाण्याचे प्रभारी कृष्णा सोळुंके करत आहेत.
ग्रामीण भागात कौटुंबिक कलहामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशय, दारूचे व्यसन आणि हिंसक स्वभाव यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय आहे.
सोनपूर परिसरातील ही घटना त्याला अपवाद ठरली नाही. टामिनबाईच्या मृत्यूनंतर दोन निरागस मुले आधाराशिवाय झाली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या संशयी स्वभावामुळे एका निरपराध स्त्रीचे जीवन संपुष्टात आले.ही घटना समाजातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला पुन्हा अधोरेखित करते.