भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमळेतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा.
एस.के.24 तास
भामरागड : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवार (ता.२८) सकाळी जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत ७० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर सुमारे १०.३० वाजता प्रार्थना व परिपाठ सुरु असताना एका विद्यार्थ्याला उलटी होऊ लागल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे दाखल करण्यात आले. काही वेळातच इतर विद्यार्थ्यांनाही उलट्या व चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागल्याने एकूण ७० हून अधिक विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
परिस्थिती आटोक्यात न आल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरिता भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून विषबाधेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे भामरागड येथे उपचारार्थ दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी आणि १० विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. विषबाधा कोणत्या खाद्य पदार्थातातून झाली याची तपासणी करण्यात येत आहे.

