चामोर्शी शिक्षक पतसंस्था संचालक मंडळ होणार बरखास्त.
एस.के.24 तास
चामोर्शी : मुख्यालय असलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चामोर्शी / मुलचेरा र. क्र. २७५ या पतसंस्थेवर संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक बसण्याची नामुष्की ओढवली आहे.मागील डिसेंबर महिन्यात डॉ सचिन बी.कुलसंगे,हेमंत एस.चावरे,अशोक पी.रायशिडाम अनिल एम.अल्लमवार,संतोष आर.नागरगोजे, अशोक खोब्रागडे, मोरेश्वर भैसारे व इतर संस्थेचे जागरूक सभासदांनी पुराव्यासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांना पत्र देऊन कारवाई करा अन्यथा आपल्या कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला बसू असे स्पष्ट कळवले होते.
याची गंभीर दखल घेऊन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका चामोर्शी यांनी श्री, आर.टी. वाघमारे सहाय्यक सहकारी अधिकारी अंतर्गत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था चामोर्शी यांच्याकडून संस्थेची चौकशी करून घेतली. दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी श्री, आर.टी. वाघमारे यांनी सविस्तर चौकशी अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तालुका चामोर्शी यांना सादर केला.
असून त्यात संस्थेच्या सभासदांनी केलेली तक्रार ही योग्य असून संस्थेचे अध्यक्ष, प्रभारी व्यवस्थापक, संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ हे दोषी असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रभावी संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करून फौंजदारी कारवाईस पात्र असल्याने प्रभारी व्यवस्थापक व संचालक मंडळाच्या नियमबाह्य कामाची व आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी असे स्पष्ट नमूद केले आहे.
यातच संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक श्री,आर.एस.श्रीकोंडावार यांनी स्वयंस्पष्ट खुलासा सादर करून संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी तसेच काही संचालक हे मला वेळोवेळी धमकी देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता करण्यास भाग पाडले व अजूनही संस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेची मोठी रक्कम स्वतःकडेच ठेवून अद्याप हिशोब दिला नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जुनी माहिती तपासली असता संस्थेच्या आठ संचालकांनी दोन वर्षांपूर्वीच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चामोर्शी यांचेकडे अध्यक्ष व व्यवस्थापक हे आर्थिक घोळ करून नियमबाह्य कामे करीत असल्याने चौकशी करून कारवाई करावी असे स्पष्ट केले होते. मात्र याप्रकरणी पाणी कुठे मुरला हे कळायला मार्ग नाही.
हा सर्व गंभीर प्रकार राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जे कि स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत त्यांच्याच क्षेत्रात इतका मोठा गैरप्रकार सुरु असून प्रशासन अजूनही कसे शांत बसले आहेत याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता मात्र चौकशी अहवाल सादर झाल्याने व अहवालात अत्यंत गंभीर बाबी स्पष्ट झाल्याने लवकरच सहकार कायद्यानुसार पतसंस्थेवर प्रशासक राज येऊन दोषींवर कठोर कारवाई होईल याकडे सामान्य सभासद व जिल्हावासी लक्ष ठेवून आहेत.

