सर्व शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र लावणे बंधनकारक अन्यथा...
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी कार्यालयात असताना कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे.अनेक वेळा सूचना दिल्यानंतरही काही अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र न लावता कार्यालयीन कामकाज करत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक क्रमांक जीएडी-३२०३६/३१/२०२५-जीएडी (रवका-१.) जाहीर करत, शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करताना आणि कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कार्यालयीन ओळखपत्र स्पष्टपणे दर्शनी भागावर लावणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात पूर्वी शासन निर्णय, दि. ०६.०२.१९८० आणि शासन परिपत्रक दि. ०७.०५.२०१४ व दि. १०.१०.२०२३ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र न लावता कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही अधिकारी कर्मचारी ओळखपत्र लावतात पण दर्शनी भागावर लावत नाहीत. काही अधिकारी कर्मचारी अजिबातच सूचना करूनही ओळखपत्र लावत नाहीत. त्यामुळे शासनाने आता स्पष्टपणे सूचना देत कठोर भूमिका घेतली आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी हे नियम पाळणार नाहीत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
परिपत्रकानुसार संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यालयात प्रवेश करतानाच ओळखपत्र लावणे आवश्यक असून, याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता शासनाने अधोरेखित केली आहे. ओळखपत्र लावल्याने कार्यालयीन शिस्त राखली जाईल, सुरक्षाव्यवस्था मजबूत होईल आणि कामकाजात पारदर्शकता येईल. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.