काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे भर रस्त्यातून अपहरण करून बेदम मारहाण.
📍काँग्रेस खासदाराकडून कारवाईची मागणी.
एस.के.24 तास
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनने श्रीरामपूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.गुजर यांना आरोपींनी टिळकनगर परिसरात एका निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली.
गुजर यांचं अपहरण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.गुजर हे सकाळी सातच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असताना एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली.या कारमधून उतरलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली.
आणि त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अपहरण केलं.उत्तर - मध्य मुंबईच्या खासदार तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या अपहरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. यासह त्यांनी पोलीस व राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
वर्षा गायकवाड यांचा गृहमंत्री फडणवीस यांना टोला. -
वर्षा गायकवाड यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की “ राज्यातले पोलीस झोपले आहेत का ? अहिल्यानगर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं आज सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली.
लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट आहे.गृहमंत्री आतातरी जबाबदारी घेणार आहेत का ? ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत. गृहखात्याला कारभार झेपत नसेल तर दुसऱ्या कुणाला जबाबदारी द्यावी.”
काँग्रेस खासदाराकडून कारवाईची मागणी. -
काँग्रेस खासदार म्हणाल्या, “ या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे! महाराष्ट्रासारख्या राज्यात राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेलं आहे की विरोधकांचे अपहरण करून मारहाण करण्यात येत आहे! याची दखल घेऊन तात्काळ कारवाई झाली पाहिजे.”

