पेट्रोल टाकून दाम्पत्याला मारहाण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न ; सराईत गुन्हेगारांना २ अटक
एस.के.24 तास
लाखनी : लाखनी तालुक्यातील पोहरा येथे रस्ता अडवून उभ्या असलेल्या तरुणांना दुचाकी बाजूला करण्यास सांगणे एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या दोन सराईत गुन्हेगारांनी पती-पत्नीसह त्यांच्या पुतण्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
पोहरा येथील रहिवासी विरांगणा विलास मेश्राम आणि त्यांचे पती पायी जात असताना ही घटना घडली.पोहरा परिसरात धम्मराज नेमीचंद मेश्राम वय,३२ वर्ष आणि भीमराज नेमीचंद मेश्राम वय,२९ वर्ष दोन्ही रा.सेलोटी यांनी दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती.मेश्राम यांनी त्यांना गाडी बाजूला घेण्याची विनंती केली असता,आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आम्ही नुकतेच कारागृहातून बाहेर आलो आहोत, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत आरोपींनी स्वतःजवळील बाटलीतील पेट्रोल दांपत्याच्या अंगावर ओतले.
आरोपींनी एवढ्यावरच न थांबता दांपत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि आगपेटी काढून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती-पत्नीला वाचवण्यासाठी आलेला त्यांचा पुतण्या याच्यावरही आरोपींनी पेट्रोल ओतून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.