मुलचेरा तालुक्यातील कंत्राटी महिला आरोग्य सेविकेच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे दोन वर्षांचा लैंगिक छळ.
📍गडचिरोली पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत,पदाचा गैरवापर करून जबरदस्ती यांनुसार गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
मुलचेरा : तालुक्यात कार्यरत कंत्राटी महिला आरोग्य सेविकेने (C-ANM) केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडले आहे.6 डिसेंबर 2025 रोजी स्वतःच्या राहत्या घरी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या य सेविकेला तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या वेगवान उपचारांमुळे तिची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या घटनामागील कारणे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागात तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.या सर्व प्रकरणाची मुळाशी गेले असता, अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित सेविकेने दिलेल्या निवेदनानुसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री वय,50 वर्ष यांनी मागील संपूर्ण दोन वर्षांच्या कालावधीत तिला सतत वेतनवाढीचे आमिष दाखवत शारीरिक संबंधांची मागणी केली.
कंत्राटी नोकरीचा अडथळा निर्माण करू, फाईल पुढे सरकवू किंवा थांबवू, वरिष्ठांकडे तुमच्याविरोधात अहवाल देऊ, अशा सूचनांमधून त्यांनी आपला प्रभाव वापरून पीडितेवर मानसिक दबाव वाढवला. या छळामुळे तिची मानसिक अवस्था एवढी बिघडली की तिने अखेरीस आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,या काळात सेविका सतत चिंताग्रस्त राहत होती, कामाच्या ठिकाणी जाणे टाळत होती आणि घरीसुद्धा दडपलेल्या भीतीमुळे सामान्य आयुष्य जगू शकत नव्हती.कोणाला काही सांगितल्यास नोकरीवर गदा येईल, किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल,या भीतीनेच तिने वर्षानुवर्षे हे सर्व सहन केले.
अखेरीस 6 डिसेंबर च्या संध्याकाळी ती मानसिक ताणाला न जुमानता विष प्राशन करून कोसळली. कुटुंबीयांनी वेळेत प्रतिसाद दिल्याने तिचे प्राण वाचले, अन्यथा ही घटना आणखी गंभीर वळण घेऊ शकत होती.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत 8 डिसेंबर 2025 रोजी Zero FIR नोंदवली.भारतीय न्याय संहिता कलम 75(2) (छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 78(2) (पदाचा गैरवापर करून जबरदस्ती) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Zero FIR दाखल झाल्यामुळे प्रकरणाचा तपास तात्काळ सुरू करण्याची प्रक्रिया गतीने हालचाल करू लागली असून आरोपी अधिकाऱ्यांवरील कायदेशीर कारवाईची पहिली पायरी पूर्ण झाली आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या पोस्टे मुलचेरा पोलीसांकडे असून, पोलिसांनी पीडितेचे प्राथमिक बयान घेण्यास सुरुवात केली आहे. उपचार घेत असतांनाच तिने दिलेल्या निवेदनामध्ये दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या छळाची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाची सविस्तर माहिती दिली आहे.
पोलिसांकडून तिच्या मोबाईल फोनची तपासणी,कॉल रेकॉर्ड्स, संदेश, व्हॉट्स'अप चॅट, तसेच या कालावधीत घडलेली सर्व पत्रव्यवहाराची पडताळणी करण्यात येत आहे. याचबरोबर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची किंवा उपस्थितांनी दिलेल्या माहितीचीही नोंद घेतली जात आहे.या प्रकरणामुळे तालुका आरोग्य विभागात आणि जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मागील काही वर्षांत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत आहेत. कंत्राटी नोकरीतील अस्थिरता, कधीही नोकरी जाण्याची भीती आणि वरिष्ठांच्या शक्तीचा गैरवापर यामुळे महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, अशी व्यापक चर्चा देखील सुरू आहे. अनेकांनी यावर तातडीने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
पीडित आरोग्य सेविकेची प्रकृती आता सुरक्षित असली तरी,तिचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशनाची गरज असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.पीडिता आणि तिच्या कुटुंबावर झालेला हा मानसिक आघात प्रचंड आहे आणि न्याय मिळेपर्यंत त्यांची अवस्था अधिकच वेदनादायी राहणार आहे.
मुलचेरा मधील या प्रकरणाने आरोग्य विभागातील स्त्री सुरक्षा,कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या संभाव्य गैरवर्तनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.या प्रकरणातून कोणते नवे सत्य बाहेर येते,आरोपीवर काय कारवाई होते आणि आरोग्य विभाग भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना कसे आळा घालतो, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

