उपविभाग भामरागड अंतर्गत अतिदुर्गम बिनागुंडा गावात नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना.
📍सन - 2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 10 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना.
एस.के.24 तास
भामरागड : (दिनांक,24/01/2026 शनिवार) माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला आहे, ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यंाचा विकास साधावा व माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने
आज दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत बिनागुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. उपपोस्टे लाहेरी पासून 17 किमी व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 08 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र बिनागुंडा मैलाचा दगड ठरेल.
सन 2025 या वर्षात दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगंुडा येथे नवीन पोलीस स्टेशन, दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशन व दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गंुडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्र व दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात येऊन अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे.
पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 11 जेसीबी, 10 ट्रेलर, 05 पोकलेन, 40 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 08 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच
पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 56 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 19, कुसळगाव बी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 09 बटा. डी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडंट व 79 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र, बिनागुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी...
महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅकेट, स्वयंपाक भांडाचा संच, बकेट, मच्छरदानी, युवकांना टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमूळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णत्वास येण्यास मदत होणार असून या भागातील 07 मोबाईल टॉवरच्या रखडलेल्या कामास गती मिळणार आहे.
यापूर्वी पावसाळ्यात गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामूळे बंगाडी, कुवाकोडी, फोदेवाडा, बिनागुंडा यासह इतर गावांचा चार महिन्यांसाठी संपर्क तुटत असे आता पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमूळे गंुडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार असून नाल्याच्या बांधकामास प्रगती मिळणार आहे. तसेच येथील दुर्गम भागात भविष्यात एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमूळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र श्री.अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, सीआरपीएफ 09 बटा. कमांडंट श्री.शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी
श्री.कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी.उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

