आल्लापल्ली येथील आरडी एजंटाची निर्घृण हत्या भरदिवसा घटना घडल्याने खळबळ.
एस.के.24 तास
आल्लापल्ली : 18 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या एका आरडी (आवर्ती ठेव) एजंटची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
राजेंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार वय,49 वर्ष असे मृताचे नाव असून त्यांचा मृतदेह सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.या घटनेमुळे संपूर्ण आलापल्ली परिसरात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र तंगडपल्लीवार हे आलापल्ली येथील प्रगती पतसंस्थेत पैसे जमा करण्याचे काम करायचे.18 जानेवारी रोजी सकाळी 11:30.च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते.दुपारनंतर त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने अखेर अहेरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
सोमवारी सकाळी 9:00.वा.च्या सुमारास नागमाता मंदिराजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह राजेंद्र यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.प्राथमिक तपासानुसार अज्ञात मारेकऱ्यांनी राजेंद्र यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले आहेत. विशेष म्हणजे, राजेंद्र यांची दुचाकी,भ्रमणध्वनी आणि बँकेची पैसे जमा करण्याची मशीन घटनास्थळावरून गायब आहे.
यावरून हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असावा,असा संशय पोलिसांना आहे उपअधीक्षक अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक) पथकाला पाचारण केले असून परिसरातील पुरावे संकलित केले जात आहेत.
अज्ञात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

