सिरोंचा-कारसपली बायपास रस्त्याचे काम रखडले ऑल इंडिया युथ फेडरेशन चा आंदोलनाचा इशारा.
📍प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची मनमानी कारभार.
एस.के.24 तास
सिरोंचा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सिरोंचा ते कारसपली बायपास रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) आक्रमक झाली असून १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष रवी बारसागंडी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, या महत्त्वाच्या बायपास मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते आणि आता ते पूर्णपणे बंद आहे.अपघातांचे सत्र आणि ग्रामस्थांचे हाल रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत.यामुळे अपघातात वाढ: खडीमुळे दुचाकी घसरून दररोज अपघात होत आहेत.रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
विद्यार्थी व रुग्णांची कोंडी - शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि आपत्कालीन स्थितीत रुग्णांना ने-आण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहनांचे नुकसान - खराब रस्त्यामुळे वाहनांचे सुटे भाग खराब होऊन वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची मनमानी करीत आहेत.संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
" रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.जर प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले नाही, तर परिसरातील समस्त ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा रवी बारसागंडी (अध्यक्ष, AIYF सिरोंचा तालुका) यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता (MSRRDA) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

