गोविंदपूर येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : गवत कापण्याकरिता जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यात महिला ठार झाली.मायाबाई धर्माजी सातपुते वय,५५ वर्ष रा.गोविंदपूर ता.गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना १५ डिसेंबरला तालुक्यातील नवेगाव येथे घडली.चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा सहावा बळी आहे.कुनघाडा (रै.) वनपरिक्षेत्राअंतर्गत नवेगाव शिवारातील कक्ष क्र. १४० मध्ये मायाबाई या झाडू बनविण्यासाठी गवत कापण्याकरता गेल्या होत्या.
यावेळी त्यांच्यासमवेत गावातील इतर महिलाही होत्या. सर्व महिला गवत कापण्यात व्यस्त होत्या. मात्र, मायाबाई सातपुते या ज्या ठिकाणी गवत कापत होत्या,तेथेच वाघ दबा धरून बसलेला होता. वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
इतर महिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने तेथून धूम ठोकली.घटनास्थळी कुनघाडा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली. मायाबाई यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

