" ओव्हरटेक " करण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने...
चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर नजीकच्या टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या भीषण अपघातात 50 प्रवासी जखमी 20 प्रवासी गंभीर.
एस.के.24 तास
गाडयांना मागे टाकण्याच्या नादात ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या भीषण अपघातात तब्बल 50 प्रवासी जखमी झालेत. त्यात 20 प्रवासी गंभीर जखमी असून उर्वरितांना किरकोळ दुखापत झाली आहे.दिनांक,24 जानेवारी रोजी दुपारी 12:00.वा.च्या सुमारास चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर नजीकच्या टोल नाक्याजवळ घडली.
गडचिरोली येथील ट्रॅव्हल्स MH.04 GP 1736 नेहमी प्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त,अंदाजे 60 ते 70 प्रवासी घेऊन चंद्रपूरहून गडचिरोलीकडे निघाली होती.हिरापूर टोल नाक्याजवळ अन्य गाड्यांना " ओव्हरटेक " करण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली.यात प्रवासी एकमेकांवर आदळून जखमी झालेत.घटनेची माहिती कळताच,पोलिस कर्मचारी,स्थानिक नागरिक व महामार्गावरील प्रवासी मदतीसाठी धावून आले. जखमींना तत्काळ बाहेर काढून सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्यापैकी गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमी प्रवाशी आपल्या सोयीप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे हिरापूर टोल नाक्याजवळ मागील आठवड्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्याने या परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून भरधाव व अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे,अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. अपघातग्रस्त खासगी बस चालकाविरुद्ध कारवाई होणार का, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्याकडे प्रशासन लक्ष देणार का,असा प्रश्न उपस्थित झाला आहे.घटनेचा तपास सावली पोलिस करीत आहेत.

