सावली येथे घरकुल बांधकामासाठी मोफत रेती व इतर मागण्यासाठी निवेदन सादर.
★ शिमगा मोर्चाची परवानगी नाकारल्याने तोंडाला काळी पट्टी व हात बांधून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध.
एस.के.24 तास
सावली : घरकुल बांधकामासाठी मोफत रेती देण्यात यावी व जनतेच्या इतर मागण्यासाठी काँग्रेस प्रणित भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या वतीने तहसीलदार सावली यांचेकडे निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र आयोजित मोर्चाची परवानगी तहसीलदार सावली यांनी नाकारल्याने आपल्याच तोंडाला पट्टी व हात बांधून तालुका प्रशासनाचा शांतपणे निषेधही केला.या अनोख्या आंदोलनाची सावलीत चर्चा रंगली.
दिनांक 13 मार्च 2025 ला तहसील कार्यालय सावली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात घरकुल बांधकामाकरिता रेती मोफत देण्यात यावी, यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेची निधी देण्यात यावी, निराधार योजनेचे अर्ज मंजूर करून लाभ देण्यात यावा, शेतातील शिव रस्ते, पाणंद रस्ते खडीकरण करण्यात यावे, जलजीवन मिशनची कामे पूर्ण करून पाणी टंचाई दूर करावी,अतिक्रमण जागेत घरकुल बांधकामास मंजुरी देण्यात यावी, रोजगार हमी योजनेची मजुरी देण्यात यावी.
गोसेखुर्द चे अर्धवट कामे पूर्ण करावे, कुटुंब अर्थसाहाय व श्रावणबाळ निराधार योजनेची रक्कम देण्यात यावी, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात यावी, असोला चक व सावंगी दीक्षित येथील प्रकल्पग्रस्ताना योग्य मोबदला देण्यात यावा, रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकामाची रक्कम देण्यात यावी, मेंढपाळ बांधवांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करा, पाण्याची टंचाई दूर करण्यात यावी या मागण्या होत्या.
मात्र तहसीलदार यांनी परवानगी नाकारल्याने मोर्चाचे आयोजक विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शांतपणे कायदा सुव्यवस्था हातात न घेता तोंडाला काळी पट्टी बांधून व हात बांधून तहसीलदार यांचेकडे निवेदन सादर केले. या अनोख्या पद्धतीमुळे प्रशासन बुचकाळ्यात पडले.
तहसीलदारांनी निवेदन घेऊन 18 मार्चला बैठक घेऊन तालुका स्तरावरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले तर शासन स्तरावरील प्रश्न सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष लताताई लाकडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक विजय मुत्यालवार,नगरसेवक प्रितम गेडाम, नगरसेवक सचिन संगिडवार
उपसरपंच विजय गडमवार, प्रमोद दाजगाये, श्रीकांत बहिरवार, विलास येनगंटिवार, विकास पुपरेड्डीवार, राजू कंचावार, मिथुन बाबनवाडे, सूर्यकांत पाडेवार,प्रवीण गावळे, सुधाकर सोनटक्के, मोहन गाडेवार, प्रकाश घोटेकर,रोशन बोरकर, रोहिदास मेंदाळे, अनिल मडावी, सतीश नंदगीरवार, विस्तारी आरेवार, गणेश मर्लावार, पांडुरंग भोयर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.