महिलोन्नती झाली तरच समाज व देशाची उन्नती. - डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपुरी : " 'जिच्या हाती पाळण्याची दोरी/ ती जगाला उध्दारी ' असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. आपल्याकडे अन्यायाची परंपरा फार दिवसांपासून सुरू आहे.सीता,द्रौपदीपासून पुरुषी अधिपत्याखाली महिलांवर अन्याय केल्या गेला.समाजसुधारक राजा राम मोहन रॉय,म.फुले, सावित्रीबाई फुले,महर्षी कर्वे,आगरकर,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलोन्नतीसाठी महत्वाचे कार्य केले.यामुळे महिला मुख्य प्रवाहात आल्या. तरीपण या पुरुषप्रधान संस्कृतीनं त्यांना दुय्यम लेखलं.प्रगत देशात स्त्री - पुरुष भेद केल्या जात नाही,त्या देशाची प्रगती झाली.
आपल्याकडे असे झाले,म्हणजे संपूर्ण महिलोन्नती साधली गेली तर समाज व देशाची उन्नती होईल." असे काव्यमय मार्मिक विवेचन प्रसिद्ध कवी, लेखक डॉ धनराज खानोरकरांनी केले.ते नागभीडच्या गो.वा. महाविद्यालयात स्व.प्रा.प्र.कृ. सुपले व्याख्यानमालेत ' महिला सबलीकरणातून समाजनिर्मिती 'विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या व्याख्येनमालेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा.मिलिंद सुपले होते तर प्राचार्य डॉ.संजय सिंग,डॉ. ज्योती दुपारे विचारपीठावर उपस्थित होत्या.अध्यक्षीय भाषणात प्रा.सुपलेंनी, "दरवर्षी होणाऱ्या या व्याख्येनमालेत आपण तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून सर्वांसाठी वैचारिक पर्वणी घडवून आणतो,हिच आमच्या बाबांना खरी श्रध्दांजली असते" असे विचार मांडले.यानंतर डॉ. ज्योती दुपारेंनी ' मी जिजाऊ बोलते ' हा एकपात्री प्रयोग सादर केला.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय सिंग यांनी केले तर संचालन डॉ.रवी रणदिवे,डॉ.दीपक मोरांडे व आभार संयोजक डॉ.निकिता मिश्रानी मानले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन.एस.कोकोडे, डॉ.माधुरी कोकोडे,डॉ.राजन जयस्वाल, प्राचार्य वसंत पाटणकर, सौ.पाटणकर,रिध्देश्वर वारजूरकर,श्रीमती महाजन, सौ.कल्याणी सुपले,समस्त प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

