ब्रम्हपुरीत तिरंगा यात्रा उत्साहात ; भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदुरमुळे जगाला भारताचे सामर्थ्य कळले. - प्रा.अतुल देशकर

ब्रम्हपुरीत तिरंगा यात्रा उत्साहात ; भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदुरमुळे जगाला भारताचे सामर्थ्य कळले. - प्रा.अतुल देशकर


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०५/२५ भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सेनेचे अभिनंदन व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समस्त देशभक्त ब्रह्मपुरीकरांच्या वतीने ब्रह्मपुरी येथे भव्य तिरंगा यात्रा पार पडली.ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील देशभक्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येत एकत्रित होत तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याला, शौर्याला वंदन करीत शहिदांना अभिवादन केले. 


शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रह्मपुरीमधील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करुन  यात्रेला प्रारंभ झाला. येथील ख्रिस्तानंद चौक - झांशी राणी चौक - संत रविदास चौक - फाशी चौक - बाजार चौक - स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गे ही भव्य दिव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आयोजकांच्या वतीने ५०० फूट लांब तिरंगा ध्वज तयार करण्यात आला होता.सहभागी देशभक्त नागरिकांनी या ध्वजाला पकडून यात्रेत सहभागी झाले.


या यात्रेमध्ये ब्राह्मोस मिसाईल ची प्रतिकृती जनतेसाठी विशेष आकर्षण होती. सोबतच यात्रेमधे पी.आर.डी स्पोर्ट्स क्लब च्या वतीने ऑपरेशन सिंदूर मधील महिला प्रमुख विंग कमांडर वॉमिक सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भूमिका साकारणारी झाकी तयार करण्यात आलेली होती. 


यात्रेमध्ये देशभक्तीच्या गीतावर ब्रह्मपुरीकर देशभक्त देशभक्तीत रंगून गेले होते. भारत माता की जय,वंदे मातरम या घोषणांनी ब्रह्मपुरी दुमदुमून गेली होती.यात्रेच्या सुरवातीला ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर व निवृत सेना अधिकारी अरविंद खोकले यांनी उपस्थित देशभक्तांपुढे आपले विचार मांडले.


भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवत संपूर्ण जगासमोर भारत देशाचे सामर्थ्य दाखवून दिल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी केले. तर निवृत्त सैनिक श्री. खोकले यांनी भारतीय सैन्याबदल गौरवोद्गार काढत भविष्यात पाकिस्तान हल्ला करेल तर जगाच्या नकाशावरून त्याचे नाव भारतीय सेना हटवेल असे सांगितले. या तिरंगा यात्रेचा समारोप भारत मातेच्या आरतीने झाला. 


या तिरंगा यात्रेमध्ये ब्रह्मपुरी शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सोबतच शहरातील निवृत्त सैनिक सुद्धा यात उत्साहाने सहभागी झाले. 


यामध्ये प्रमुख्याने ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, रा.स्व. संघाचे विभाग संघचालक जयंतराव खरवडे, व्यापारी संघटनेचे इकबाल जेसानी, दलित समाजाचे नेते डॉ.राहुल मेश्राम,एकात्मता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कहारे


भाजपा ओबोसी मोर्चाचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विनोद नवघडे, शिवसेनेचे नरू नरड, विश्व हिंदू परिषदेचे रोशन नवघडे, अमित मेंडुले  संजय पारटवार उपजिल्हा प्रमुख ब्रह्मपुरी,नरेंद्र नरड तालुका प्रमुख,कवळु पिंपळकर उप तालुका प्रमुख, अमोल माकोडे शहर प्रमुख यांच्या सह हजारोंच्या संख्येने देशभक्त ब्रह्मपुरीकर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !