अन्य युवकाशी मैत्री खटकल्यामुळे प्रियकराने प्रेयसी ची कोयत्याने वार करून केला खून ; सीसीटीव्हीत थरार कैद.
एस.के.24 तास
नागपूर : विधवा असलेल्या महिलेशी एका युवकाचे सूत जुळले.दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. दोघांचेही संबंध सुरळीत असतानाच तिची एका अन्य युवकाशी मैत्री झाली. ती मैत्री खटकल्यामुळे प्रियकराने तिचा कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभ्यात घडली.
हेमलता वैद्य (३२, अंकाशी सोसायटी, दाभा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या हत्याकांडात महिलेचा प्रियकर अक्षय दाते (२४) याला गिट्टीखदान पोलिसांनी ८ तासांत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता ही मूळची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आहे. लग्नानंतर ती नागपुरात स्थायिक झाली. तिला १० वर्षाची मुलगी असून गेल्या पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे आजारपणात निधन झाले. तेव्हापासून ती मुलीसह दाभ्यातील अंकाशी सोसायटीत राहत होती. यादरम्यान, हिंगणघाट येथील तरुण अक्षय दाते हा नागपुरातील एका कंपनीत नोकरी लागला.
दोघांची सीताबर्डीत खरेदी करताना भेट झाली. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. हेमलता हिने त्याला जेवण करायला घरी बोलावले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमलता ही अंकाशी सोसायटीत ‘केअर टेकर’ म्हणून काम करीत होती. तिच्यासाठी बिल्डरने एक फ्लॅट दिला होता. त्या फ्लॅटमध्ये दोघेही राहत होते.
चारित्र्यावर संशय : -
हेमलता आणि अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला अक्षयच्या कुटुंबियांचा विरोध होता. मात्र, अक्षयने लग्नाची तयारी केली होती. यादरम्यान, हेमलताची अन्य एका युवकाशी मैत्री झाली. ती मैत्री अक्षयला खटकली. याच कारणातून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजता कोयत्याने हेमलतावर हल्ला केला. त्यात हेमलता गंभीर जखमी झाली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हेमलताचा बुधवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला.
आरोपीला आठ तासांत अटक अक्षयने हेमलताचा खून केल्यानंतर पळ काढला.तो थेट हिंगणघाटला जाण्यासाठी निघाला. ठाणेदार कैलाश देशमाने यांनी तांत्रिक तपास करुन अक्षयला आठ तासांत अटक केली. त्याने चारित्र्यावरील संशयातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
मी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करणार होतो. परंतु, ती मला दगा देत होती. त्यामुळे तिचा मी खून केला’ अशी कबुली प्रियकर अक्षयने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.