सरपंच महिलेचा प्रताप वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून वय वाढवले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिला सरपंचाला अपात्र ठरवले.

सरपंच महिलेचा प्रताप वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून वय वाढवले.


अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिला सरपंचाला अपात्र ठरवले. 


एस.के.24 तास


भंडारा : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणी काय करेल, याचा नेम नाही. वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी एका महिला सरपंचांनी चक्क बनावट आधार कार्ड तयार करून स्वत:चे वय वाढवले. त्यानंतर योजनेचा लाभही घेतला. या प्रकरणाचे बिंग फुटल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिला सरपंचाला अपात्र ठरवले. मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव/कान्ह. येथे हा प्रकार उघडकीस आला.

सरपंच रेखा गभणे यांनी वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून वय वाढवले होते. त्यांनी सरपंच होण्यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसरे बनावट आधार कार्ड तयार केले होते.त्या आधार कार्डवर वय ४९ वरून थेट ७१ केले होते. १ जानेवारी २०२१ पासून शासनाकडून अनुदानही घेतले.

मोहाडीच्या तहसीलदारांनी,शासनाची फसवणूक करून शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचा ठपका ठेवला. दरम्यान, पिंपळगाव/ कान्ह येथील उपसरपंच उमेश उपरकर यांनी १२ डिसेंबर २०२४ ला सरपंच गभणे यांच्याविरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते.

सदर प्रकरणाचा निकाल देत अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी आदेश पारित केला. या आदेशानुसार सरपंच गभणे, सरपंच व सदस्य मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ -१ (ज)अंतर्गत दोषी आढळून आल्याने त्यांना पदावरून कमी करण्यात आले. तसेच पद रिक्त झाले,असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

असे फुटले बिंग : -

मोहाडी च्या तहसीलदारांमार्फत वृद्धपकाळ निर्वाह योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे मागवण्यात आले. त्यात रेखा गभणे यांनी ७१ वर्षे वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले. 

परंतु, सरपंचपदाचे नामनिर्देशन दाखल करताना ४९ वयाचे आधार कार्ड जोडले होते. याप्रकरणी उपसरपंच उमेश उपरकर यांनी जिल्हाधिकारी, मोहाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. गभणे यांना सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

बनावट आधार कार्ड : -

सरपंच गभणे यांनी आठ वर्षांपूर्वी वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून दोन बनावट आधार कार्ड तयार करून घेतले.एकावर १० नोव्हेंबर १९७५, तर दुसऱ्या आधार कार्डवर १ जानेवारी १९५३ अशा जन्मतारखा मुद्रित आहेत. त्या दोनपैकी दुसरे आधार कार्ड वापरून त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. खोट्या जन्मतारखेच्या आधार कार्डनुसार त्यांचे वय ७१ वर्षे आहे. प्रत्यक्षात त्यांचे वय ४९ वर्षे आहे.

नामनिर्देशन पत्रावर खरी जन्मतारीख : -

रेखा गभणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी ऑनलाइन नामनिर्देशन दाखल केले होते. प्रमाणपत्रावर आणि ऑनलाइन अर्जातही १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख लिहिलेली आहे. त्यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी येथील असून,तेथील शाळेतील रेकॉर्डवरही १० नोव्हेंबर १९७५ हीच जन्मतारीख नोंदविलेली आहे, हे येथे उल्लेखनीय.

सरकारची दिशाभूल : -

त्यांनी निवडणूक लढण्यासाठी टीसीचा आधार घेतला. वृद्धपकाळ निर्वाह योजनेच्या लाभासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला, दोन्ही आधार कार्ड बघितल्यावर हे लक्षात येते. त्यांच्या आंधळगाव येथील बँक खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये मानधन जमा झाले होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !