मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील महाकाली मंदिराजवळ झोपेत असलेल्या मेंढपाळ वासुदेव कंकलवार यांच्यावर वाघाने झडप घातल्याने जागीच ठार.
📍मेंढपाळ बांधवांचे जीवन धोक्यात प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील फिस्कुटी परिसरात वाघाने केलेल्या थरारक हल्ल्यात एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक,13/03/2026 गुरुवारी 12:30 वा.च्या मध्यरात्री घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व कुरमार / धनगर समाज कडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव गणपत कंकलवार वय,41वर्ष रा.जुनासुर्ला हे मेंढपाळ म्हणून मेंढ्यांची राखण करण्यासाठी फिस्कुटी येथील महाकाली मंदिराजवळ रामदास जेंगठे यांच्या शेतात मेंढ्यांची लाग बसवून झोपले होते.त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ मारोती कंकलवार यांची पत्नी वनिता कंकलवार देखील उपस्थित होत्या.
रात्रौ अंदाजे 1:30 वा.च्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला.झोपेत असलेल्या वासुदेव कंकलवार यांच्यावर वाघाने झडप घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग,वन विभाग तसेच फिस्कुटी येथील सरपंच नितीन गुरनुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून मुल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व मेंढपाळांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रौ च्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात येत असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी / मेंढपाळबांधव वन विभागाकडे केली आहे.

